नांदेडमध्ये पावसाअभावी पाणीटंचाई; 156 टँकरने पाणीपुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

जून महिना उलटला जुलैचा पहिला आठवडा सुरू झाला तरीही नांदेड जिल्ह्यात चांगला पाऊस झाला नसल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. जुलै महिन्यात पहिल्यांदाच 156 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास जिल्ह्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विष्णूपुरी प्रकल्पात महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा असून पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. परिस्थिती गंभीर झाली तर यात आणखी कपात करुन पाण्याच्या वेळेत बदल करावा लागणार आहे.

यावर्षी नांदेड शहर व जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंतचा निम्माही पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे अनेक ठिकाणी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. नवामोंढा या बी-बियाणांचा बाजारात शुकशुकाट आहे. पावसाअभावी जिल्ह्यात जुलै महिन्यातही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यात 156 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रामुख्याने लोहा, मुखेड, नांदेड, देगलूर व बिलोली तालुक्याच्या काही भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच 1122 ठिकाणी बोअरवेल आणि विहिरीचे अधिग्रहण आजही कायम असून पाणीटंचाई उपाययोजनेला 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या वीस वर्षात एवढी गंभीर परिस्थिती कधीही निर्माण झाली नाही.

जलपातळी तिनशे ते चारशे फूट खोल गेली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. ग्रामीण भागात कोरड्या पडलेल्या विहिरी, बोअरवेल आणि चाऱ्याचा अभाव असल्याने जनावरांनाही चारा मिळत नाही. जनावरांच्या चाऱ्यासोबत पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज मागच्या आठवड्यात हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, नांदेड जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या आहेत. पावसाच्या आशेने काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा आतुरतेने पावसाची वाट बघत आहे.