
सामना प्रतिनिधी, नगर
नगर जिल्ह्यासाठी वरदान असणार्या मुळा आणि भंडारदरा धरणात पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन होण्याची दाट शक्यता आहे, पाऊस उशिरा पडला तर पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात महत्वाची आठ धरणे आहेत. मागील सन 2017-2018 या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने या धरणांचा साठा भरलेला नव्हता. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा पूर्णपणे संपत आला आहे. निळवंडे धरणात 11.54 टक्के पाणी शिल्लक आहे. यासह अढाळा- 13.49 टक्के, खैरी-2.70, सीना-5.96 टक्के पाणी साठा शिल्लक आहे.
दुष्काळाची दाहकता वाढत चालली असून जिल्हयात टँकरचा आकडा जवळपास 851 पर्यंत जाऊन पोहचला आहे. यावर आता मुळा आणि भंडारदरा धरणातील पाणीसाठा देखील कमी होत असल्याने वेळेत जर पाऊस जर आला नाही तर भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. सध्या भंडारदरा धरणातून आवर्तन सोडले असताना मुळा धरणात मात्र, पाण्याची पातळी अधिक खालावल्यामुळे पाण्याचे संकट नगरकरांवर ओढवणार आहे. पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने वेळेत पाऊस आला तरच उपयोग होणार आहे. अन्यथा धरणातून पाणी उपसायचे कसे व किती असा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. सध्या शहरातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी वाड्यावस्त्यापर्यंत व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे.






























































