नगर जिह्यातील 50 गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता

नगरमध्ये पाऊस भरपूर झाला तरीही एप्रिल व मे महिन्यात जिह्यातील काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावेच लागते. यंदा जिह्यातील सुमारे 50 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज बांधत जिल्हा प्रशासनाने 7 कोटी 37 लाख 52 हजार रुपयांच्या टंचाई आराखडय़ाला मंजुरी दिली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने टँकरसाठी 3 फेब्रुवारीपर्यंत निविदा मागविल्या आहेत. गतवर्षी संरक्षित ठेव रक्कम अधिक असल्यामुळे निविदेला प्रतिसाद मिळाला नव्हता. तो अनुभव पाहता प्रतिसाद मिळावा यासाठी यंदा ती रक्कम कमी करण्यात आली आहे.

फेब्रुवारी, मार्च महिना सुरू होताच जिह्यातील काही गावांत पाणीटंचाई जाणवू लागेल. ग्रामीण भागातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाच्या वतीने टँकर सुरू केले जातात. 2019 मध्ये पाचशेपेक्षा अधिक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. यामुळे टँकरची संख्यादेखील 870 वर पोहोचली होती. टँकरसाठी 70 कोटींपेक्षा अधिक खर्च झाला होता.

गेल्या तीन वर्षांपासून जिह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे भूजलपातळी वाढून विहिरींची पाणीपातळी उन्हाळ्यातदेखील कायम राहिली. त्यामुळे गेली दोन वर्षे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमालीची कमी झाली आहे. यंदादेखील भरपूर पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्हाभरातील सर्वच विहिरींची पाणीपातळी चांगली आहे.

एप्रिल व मे महिन्यात 40 ते 50 गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा साडेसहा कोटींचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर टँकर निविदा मागवली आहे. त्यासाठी मोटार वाहतूकदारांसाठी 3 फेब्रुवारीची डेडलाईन दिली आहे. दाखल झालेल्या निविदांची 6 फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निविदा उघडण्यात येणार आहेत.

गेल्यावर्षी संगमनेर, नगर, पारनेर, अकोले, शेवगाव व श्रीगोंदा या तालुक्यांतील 50 गावे आणि 170 वाडय़ांना पाणीटंचाईची झळ बसली होती. यामध्ये संगमनेर तालुक्यातील गावांची संख्या अधिक होती. या टंचाईग्रस्त गावांतील 74 हजार 463 लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची निविदा मागवली होती; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या गावांसाठी 30 शासकीय टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला. टँकर कमी पडल्याने संभाजीनगर व धुळे येथूनही शासकीय टँकर मागविण्यात आले होते.