व्हेनिस शहराच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेश जलवाहतुकीने जोडणार, मुंबईतून थेट डोंबिवली-कल्याणला बोटीने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

मुंबईला लाभलेल्या समुद्रकिनाऱयाचा वेगवान जलवाहतुकीसाठी उपयोग होणार आहे. त्यासाठी मुंबई शहर, उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा-भाईंदर ही शहरे जलवाहतुकीने जोडण्याच्या योजनेला वेग आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रहिवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेगवान बोटी आणि आधुनिक जेटी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने 1 हजार 16 कोटींहून अधिक रुपये खर्चाचा प्रकल्प आखला आहे.

इटलीमधील व्हेनिस शहरातील दळणवळण प्रामुख्याने बोटीतून होते. मुंबईलाही समुद्र-खाडय़ांचे वरदान लाभले आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूककाsंडीवर मात करून पर्यावरणपूर्वक, आरामदायी व किफायतशीर प्रवासासाठी जलवाहतुकीचा पर्याय निवडण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशात वास्तव्य करणाऱया प्रवाशांना जलवाहतुकीचा पर्याय देण्याची योजना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आखली आहे. त्यासाठी वसई-ठाणे-कल्याण या राष्ट्रीय जलमार्ग 53 या योजनेअंतर्गत जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यात भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली या चार ठिकाणी जलवाहतुकीसाठी जेटी व इतर प्रवासी सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 99 कोटी 67 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत.

खाडय़ांचे खोलीकरण

या योजनेच्या दुसऱया टप्प्यात ठाणे खाडीमध्ये वाशी, ऐरोली, ठाणे-मीठबंदर आणि मुलुंड या चार ठिकाणी जेटीचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच या भागातल्या खाडय़ांमधील गाळ उपसून खोली वाढवण्याच्या योजनेवर सुमारे 330 कोटी 79 लाख रुपये खर्च करण्याची योजना आहे.

कुलाब्यातून डोंबिवलीत

तिसऱया टप्प्यात ठाणे खाडी व वसई खाडी (उल्हास नदी) एकमेकांना जोडण्यासाठी ठाणे-मीठबंदर ते कशेळी हा जलमार्ग तयार होणार आहे. त्यासाठी 424 कोटी रुपये खर्चाची योजना आहे. गेट वे ऑफ इंडिया व रेडिओ क्लबजवळ जलवाहतुकीसाठी जेटी व इतर सुविधांसाठी 162 कोटी 20 लाख रुपयांच्या खर्चास यापूर्वीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. लवकरच या जेटीचे काम सुरू होईल. या जेटीमुळे दक्षिण मुंबई ते ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई ही शहरे जलमार्गाने जोडल्यावर रस्ते व रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होईल.