
>> स्पायडरमॅन
भूतकाळात ‘शीतयुद्ध’ आणि त्याचे झालेले परिणाम आपण विद्यार्थीदशेत चांगले अभ्यासलेले आहेत. जागतिक महाशक्तींमध्ये झालेल्या या शीतयुद्धाचे परिणाम जगाच्या काही भागावर अजूनही पडत असतात असे म्हटले जाते. असे असले तरी सध्याच्या आधुनिक काळात जग एका वेगळ्याच शीतयुद्धाच्या दिशेनं जात असल्याचे तंत्रज्ञान विश्वातील तज्ञांचे सांगणे आहे. जगभरातील या तज्ञांनी जगाला यासाठी सावधगिरीचा इशारादेखील दिला आहे.
औद्योगिक क्रांतीने अनेक नवनव्या विचारांना जन्म दिला. या क्रांतीमुळे अनेक नवनव्या शोधांचा उगम झाला. आज आपण जे एक अत्याधुनिक जग बघत आहोत, ते निर्माण करण्यात या औद्योगिक क्रांतीचा खूप मोठा हात आहे. आता लवकरच आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये प्रवेश करणार आहोत. 21 व्या शतकातील या क्रांतीमध्ये विजय मिळवण्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज कंपन्या एकमेकीशी स्पर्धा करायला तयार होत आहेत. आर्टिफिशल इंटेलिजन्स, डाटा आणि क्लाऊड कॉम्प्युटिंगसारख्या मानवजातीचे भविष्य मानल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये वर्चस्वासाठी जणू एक लढाईच लढली जाणार आहे. या लढाईसाठी तोफा, बंदुका नाहीत, तर डाटा आणि इंटलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जाणार आहे. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरणा देताना तज्ञांनी चीन आणि अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या ‘ट्रेड वॉर’चे उदाहरण दिले आहे. अमेरिकेतील विविध तंत्रज्ञानाची हेरगिरी करून ते हस्तगत करण्याचा प्रयत्न चीन करते आहे असा अमेरिकेने आरोप केला आहे.
अमेरिकेच्या आधुनिक शस्त्रप्रणालीच्या माहितीवरदेखील चीनचा डोळा असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. यावरूनच दोन देशांत तणाव निर्माण झाला आहे. कोणत्याही मोठय़ा विदेशी कंपनीला चीनमध्ये आपला प्लॅंट लावायचा असेल, तर आपले उत्पादन तंत्रज्ञान चीनबरोबर ‘शेअर’ करावे लागते आणि याचाच फायदा घेऊन चीन या मोठय़ा कंपन्यांच्या उत्पादनाची नक्कल अत्यंत स्वस्त दरात तयार करून जागतिक बाजारपेठेत उतरवत असतो. त्यामुळे सर्वच मोठय़ा उत्पादन कंपन्या चीनवर नाराज असतात.




























































