निसर्गरम्य ठिकाणी नयनरम्य विवाहसोहळा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज डेस्टिनेशन वेडिंगचा जमाना आहे.. प्रत्येकालाच आपला विवाह सोहळा संस्मरणीय व्हावा असे वाटत असते.. पाहूया महाराष्ट्रातील, हिंदुस्थानातील झगमगती विवाहस्थळे..

डेस्टिनेशन वेडिंग. विवाह.. अनेक मापं.. परिमाणे लागून.. लावूनही.. विवाह ही आपल्यासारख्या सामान्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची घटना असते.. ती आयुष्यभर अत्तरागत दरवळत कशी राहील यासाठी सगळेचजण खूप तरल आणि उत्कट असतात.. पूर्वी घराच्या अंगणात मंडप घालून होत असलेली लग्ने भाडे देऊन घेतल्या जाणाऱ्या सभामंडपात पोहोचली.. सभामंडप जेवढा मोठा, प्रशस्त.. सुखसोयीनी युक्त.. तेवढा तो विवाहसोहळा वजनदार.. हळूहळू विवाहसोहळे खुल्या मैदानात होऊ लागले.. बहुतेकदा ही श्रीमंतांचीच मक्तेदारी होती.. पण आता मध्यमवर्गीय मानसिकताही बदलू लागली आहे.. हा आपला अत्यंत खाजगी सोहळा देखणा.. भरजरी.. सगळ्यांच्या.. विशेषत: समाज माध्यमांच्या नजरेत भरणारा व्हावा असे आता बऱ्याचजणांना वाटू लागले आहे.. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीज परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करू लागले.. एखादी खानदानी वास्तू.. तिथे हवी तशी पारंपारिक सजावट .. हवी तशी वातावरणनिर्मिती.. एक वेगळेच हवेहवेसे जग.. ही भुरळ सामान्यांना न पडती तरच नवल.. मग आपला महाराष्ट्र यात मागे कसा राहील.. महाराष्ट्रातील देखणी डेस्टिनेशन्स देखण्या विवाहसोहळ्यांसाठी सज्ज झाली..

1) पुण्यातील ढेपेवाडा
डेस्टिनेशन वेडिंगसाठी पुण्यातील ‘ढेपेवाडा’ सध्या अशा सोहळ्यांसाठी फारच लोकप्रिय आहे. सिद्धार्थ चांदेकर – मिताली मयेकर, सुरभी हांडे अशा अनेक सेलिब्रेटीजंनी या ठिकाणी आपली लग्नगाठ बांधली आहे. खरंतर महाराष्ट्राला ऐतिहासिक वाडासंस्कृतीचा परिसस्पर्श लाभलेला आहे. अनेकांना पिढ्यानपिढ्या भव्यदिव्य वाड्यात राहण्याचं सौभाग्य लाभलं असेल. मात्र वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा हव्यास यामुळे महाराष्ट्रातील अनेक वाडे आज जमिनदोस्त झाले आहेत. मात्र काही वास्तूप्रेमींनी आपले राजेशाही वाडे आजही त्याच दिमाखात उभे ठेवले आहेत. शहरीकरणाच्या गर्दीतून लांब आणि ऐश्वर्यात लग्नसोहळा साजरा करायचा असेल तर पुण्यातील ढेपेवाडा एक उत्तम ठिकाण ठरू शकतं. या वाड्यात तुम्हाला लग्नाप्रमाणेच इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करता येऊ शकतं. तुमच्यासाठी येथे सुसज्ज महाद्वार, नगारखाना, समारंभांसाठी पाचखणी चौक, पारंपरिक स्वयंपाकघर, माजघर, विहीर, बंब, घंगाळ असे पूर्वीचे न्हाणीघर, पारंपरिक लाकडी सजावटीचा दिवाणखाना अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यामुळे तुमच्या विवाहसोहळ्यातील अनेक विधींना एक ऐतिहासिक आणि पारंपरिक टच मिळू शकतो. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हा ठिकाणी लग्न करायचं असेल तर या ढेपेवाड्याच्या संकेतस्थळाला भेट अवश्य द्या. नितीन ढेपे दापत्यांचा हा वाडा तुमच्या विवाहसोहळ्यासाठी नक्कीच सज्ज असेल.

2) सगुणाबाग
नेरळपासून काही किलोमीटरच्या अंतरावर वसलेलं सगुणाबाग हे फार्म रिसॉर्ट देखील लग्नसोहळ्यासाठी लोकप्रिय होत आहे. अमेरिकेतील नोकरी सोडून शेखर भडसावळे या एका निसर्गवेड्या माणसाने आपल्या शेतीचं रूपांतर एका इकोफ्रेन्डली रिसॉर्टमध्ये केलं आहे. अनेक लोक या ठिकाणी वन डे अथवा स्टे पिकनिकसाठी येतात. इकोफ्रेन्डली निवास स्थान, मोठमोठे वृक्ष, झोपाळे, नदी, धबधबे, बैलगाडी सफर, शेती अशा अनेक गोष्टींमुळे या ठिकाणाला एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.सखी गोखले आणि सुव्रत जोशी या सेलिब्रेटी कपलचा लग्नसोहळा सगुणाबागेत पार पडला.

3) कर्जत
कर्जत गावात अनेक फार्म हाऊस आणि रिसॉर्ट आहेत. ज्यामुळे शहरापासून दूर आणि निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही तुमच्या लग्नसोहळ्याचा आनंद लुटू शकता. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे ठिकाण फार सुंदर आहे.

4) लोणावळा
लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं बाराही महिने फिरण्यासाठी लोकप्रिय आहेत. बरेच लग्नसोहळे एप्रिल, मे आणि नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांमध्ये आयोजित केले जातात. जर तुम्हाला थंडीच्या दिवसात थंड हवेच्या ठिकाणी लग्नसोहळ्याचा आनंद लुटायचा असेल तर लोणावळा-खंडाळामधील एखादे रिसॉर्ट बुक करा. ज्यामुळे तुम्हाला लग्नसोहळ्याचा अगदी छान आनंद लुटता येऊ शकतो. या ठिकाणी गेल्यामुळे दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांना एक छान ब्रेक मिळू शकतो. ज्यामुळे तुमचा विवाहसोहळा सर्वाच्या छान लक्षात राहू शकतो. दोन-चार दिवस आधीच गेल्यामुळे तुम्हाला लग्नाची दगदगदेखील जाणवणार नाही.

5) अलिबाग
डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुम्हाला असं ठिकाण हवं असतं जे प्रेक्षणीय असेल आणि तुमच्या बजेटमध्येदेखील असेल. त्यामुळे तुमच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी अलिबागची निवड करू शकता. अलिबागला मिनी गोवा असंही म्हटलं जातं. गोव्यात अनेक लोक डेस्टिनेशन वेडिंगचा आनंद तुटतात. कारण तिथे अथांग समुद्रकिनारे आणि रिसॉर्ट आहेत. मात्र त्यामुळे लग्नाच्या सिजनमध्ये गोव्याला फार गर्दी असते. समुद्रकिनारी लग्नसोहळ्याचा आनंद तुम्ही महाराष्ट्रातील अलिबागमध्येदेखील नक्कीच लुटू शकता. एव्हरग्रीन मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कोवर यांनी अलिबागमध्येच डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं.

6) माथेरान
रायगड जिल्हातील माथेरान थंड हवेचं ठिकाण आहे. दरवर्षी पिकनिकसाठी अनेक पर्यटक माथेरानला भेट देतात. मात्र माथेरानला डेस्टिनेशन वेडिंग करणं नक्कीच हटके ठरेल. मुंबई आणि पुण्यापासून माथेरान अगदी जवळ असल्याने लग्नसोहळ्यासाठी हे ठिकाण अगदी बेस्ट ठरेल. माथेरानमध्ये अनेक हॉटेल्स आणि व्हिला आहेत जिथे आगाऊ नोंदणी करून तुम्ही तुमच्या लग्नाचा वेन्यू ठरवू शकता.

7) महाबळेश्वर
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन थंड हवेच्या ठिकाणांना भेट द्यायला कोणाला आवडणार नाही. त्यामुळे लग्नासाठी जर तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना महाबळेश्वरला येण्याचं आमंत्रण दिलं तर ते नक्कीच खुश होतील. नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत मजा मस्ती करत लग्नाचे विधी करण्यात एक वेगळीच मौज येऊ शकते. शिवाय यामुळे तुमचा विवाहसोहळा सर्वाच्या नेहमीच लक्षात राहू शकतो. सर्वांना थंड हवेच्या ठिकाणी गेल्याचा आनंददेखील घेता येईल. संसाराची सुरूवात अशा मनमोहक आणि रम्य ठिकाणी सर्वांच्यासोबत करण्याची जर तुमची इच्छा असेल तर डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाबळेश्वरचा जरूर विचार करा.

8) येऊर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेलं येऊरचं जंगल म्हणजे जणू ठाण्यातील हरित श्रीमंतीच. पर्यटनासाठी हे ठिकाण प्रसिद्ध असलं तरी तिथली शांतता मनाला प्रसन्न करणारी नक्कीच आहे. घनदाट जंगल आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे लग्नासाठी हे ठिकाण अगदी निराळं ठरेल. जंगलाचं सौंदर्य आणि प्राणीजीवनाला त्रास होणार नाही याची काळजी घेत या ठिकाणी लग्नसोहळा आयोजित करण्यास काहीच हरकत नाही. येऊरमध्ये अनेक बंगले आहेत त्यातील एखादा बंगला भाडेतत्वावर घेऊन तिथे तुम्ही लग्नसमारंभ आयोजित करू शकता. शहरापासून फार दूर नसलं तरी चांगला एकांत आणि निवांतपणा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो.

9) जाधवगड
पुण्यातील सासवड – नारायणपूर रस्त्यावर असलेलं जाधवगड रिसॉर्टदेखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी अगदी मस्त आहे. हॉटेलच्या महाद्वाराजवळ तुतारी आणि ढोल ताशांनी तुमचं स्वागत केलं जातं. आलिशान आणि शाही थाटात लग्नसोहळा करायचा असेल तर ही छोटेखानी गढी तुमच्या कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवेल. सध्या ही गढी विठ्ठल कामत यांनी घेतलेली आह आणि तिथे एक हेरिटेज हॉटेल विकसित करण्यात आलं आहे. त्यामुळे पारंपरिक कार्यक्रमांसाठी हे ठिकाण भाडेतत्वावर नक्कीच मिळू शकते.

विवाह सोहळा हटके करण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा दर्दींना समुद्राच्या लाटांचा आवाज, नारळी-पोफळीची सजावट अशा वातावरणात मंगलाष्टके आणि मग बोटीवर रिसेप्शनच्या फोटो शूटची नेहमीच भुरळ पडते. अशा अफलातून आणि वेगळ्या डेस्टिनेशनची गरज ओळखून ‘महाराष्ट्र पर्यटन संचालनालया’ने खास लग्नासाठी कोकण किनारपट्टी ‘डेस्टिनेशन बीच’ने सुसज्ज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Beach Wedding Destinations in Maharashtra)
अलीकडे अनेक जोडपी समुद्र किनाऱ्यावर लग्नाचा पर्याय विचारात घेत आहेत; परंतु त्यासाठी ठिकाणे निवडताना काहीसा गोंधळ उडतो. अशी हटके कल्पना डोक्यात असणाऱ्यांसाठी आता फार दूर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रात बीच वेडिंगसाठी परवानगी असणारी काही ठिकाणे आपला लग्न सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून (Directorate of Tourism Maharashtra) ‘प्रमोट’ केली जात आहेत.

श्रीवर्धन
श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर शेकाडी येथे बीच वेडिंग संकल्पना सध्या रुजत आहे. या ठिकाणचे रिसॉर्ट्स अगदी कमी दरात आपल्याला राहण्याची, खाण्याची, सजावट व लग्नासाठीच्या परवानगीसह पॅकेज उपलब्ध करून देतात. श्रीवर्धनच्या पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यावर हा अनुभव नक्कीच लक्षणीय ठरतो.

हरिहरेश्वर
हरिहरेश्वर येथे बीच वेडिंगसाठी अनेक रिसॉर्ट्सचे पर्याय उपलब्ध आहेत, आपल्या बजेटनुसार आपण निवड करू शकतो. हरिहरेश्वर बीच रिसॉर्ट, ट्रँक्विल बीच रिसॉर्ट याशिवाय एमटीडीसी हरिहरेश्वर रिसॉर्ट हे जोडप्यांच्या ‘हिट लिस्ट’वर आहेत. अगदी चौपाटीवरच असणाऱ्या या रिसॉर्ट्सच्या आवारात आपण लग्नकार्य करत असल्याने परवानगीचा ताप कमी होतो.

तारकर्ली
तारकर्लीमध्येही (जि. सिंधुदुर्ग) बीच वेडिंगसाठी अनेक रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. यासाठी छोटेखानी कॉटेजचाही विचार होऊ शकतो. मालवण पट्ट्यावरील चिवला चौपाटी हे शांत आणि फार वर्दळ नसलेले ठिकाण एका खासगी लग्नासाठी बेस्ट ठरते. यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज करावा लागतो. जर आपल्याला अगदीच काहीतरी भन्नाट करायचे असेल तर तारकर्ली येथे ‘स्कुबा डायव्हिंग वेडिंग’विषयी सुद्धा चौकशी करू शकता.

रत्नागिरी
रत्नागिरी शहरापासून काहीच अंतरावर असणारे काही समुद्रकिनारे अत्यंत शांत आणि मोहक आहेत. भाट्ये चौपाटी, देवघळी येथे सूर्यास्ताच्या रंगीत छटा पसरलेल्या असताना सात फेरे घेण्याचा अनुभव विचार करूनही अंगावर शहारा आणतो. देवघळी येथील टेबल पॉईंट हे लग्नमंडपासाठी एक मोहक ठिकाण ठरेल. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात विचारणा करू शकता.

आपल्या देशातही अशी काही खास ठिकाणे आहेत जिथे तुम्ही बजेटमध्ये याचं प्लॅनिंग करु शकता.

ऋषिकेश
ऋषिकेश डेस्टिनेशन वेडिंगसाठी फारच परफेक्ट ठिकाण मानलं जातं. चोहीकडे असलेली हिरवीगार झाडे, गंगा नदीचं खळखळून वाहणारं पाणी आणि उंचच उंच डोंगर तुमच्या वेडिंग फोटोंना वेगळाचा लूक मिळवून देतील. इतकेच नाही तर इथे अनेक हॉटेल्सही आहेत, जिथे तुम्हाला वेडिंगसाठी आकर्षक ऑफरही दिल्या जातात. जर तुम्हाला आणकी कमी बजेटमध्ये लग्न करायचं असेल येथील वेगवेगळी आश्रमं सुद्धा उपलब्ध होऊ शकतात.

वाराणसी
वाराणसी सुद्धा यासाठी फार चांगलं ठिकाण ठरु शकतं. गंगेच्या किनारी सुंदर डेकोरेशन करुनही तुम्ही हे लग्न संस्मरणीय करु शकता. वाराणसी हे ठिकाण बजेटच्या दृष्टीकोनातूनही चांगलं ठरु शकतं. राहण्यापासून ते खाण्या-पिण्याच्या सर्वच सुविधा इथे उपलब्ध आहेत.

उत्तराखंड
उत्तरखंडमध्येही नैनीताल, मसूरी, मनाली, शिमला, देहरादून सारखी ठिकाणे केवळ करणाऱ्यांच्याच नाही तर या लग्नात सहभागी होणाऱ्या लोकांच्याही नेहमीसाठी लक्षात राहतील. इथे तुम्ही कमीत कमी बजेटपासून ते हाय बजेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करु शकता. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स इथे उपलब्ध आहेत. जे तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार निवडू शकता.

केरळ
आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी लोकप्रिय असलेलं केरळही डेस्टिनेशन वेडिंगसाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरु शकतं. इथे मुन्नार, कोव्वलम बीच सारखी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही पूर्ण एन्जॉय करु शकता.

शेखावती
हे राजस्थानमधील सुंदर आणि ऑफ-बीट डेस्टिनेशनपैकी एक आहे. इथे उदयपूर आणि जोधपूर इतका पैसा खर्च करावा लागत नाही. पण तरी सुद्धा सेलिब्रेशन रॉयल पद्धतीने करता येतं. शेखावतीमध्ये वाड्यात तुम्ही लग्नाचा वेगळा अनुभव घेऊ शकता. हे येथील सर्वात लोकप्रिय वेडिंग डेस्टिनेशनपैकी एक आहे.

हिमाचल प्रदेश
डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुम्ही हिमाचल प्रदेशमध्येही प्लॅन करु शकता. कसौल, मलाना, मनाली, डलहौजीसारख्या ठिकाणी तुम्ही हे सेलिब्रेशन करु शकता. त्यासोबतच इथे खूप मंदिरं आहेत जिथे तुम्ही लग्न करु शकता.