लाल किल्ल्याचे वजन घटले, जाणून घ्या काय आहे कारण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पहिल्या स्वातंत्र्यदिनासह हिंदुस्थानच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेला आणि देशाची आन, बान व शान असलेल्या लाल किल्ल्याचे वजन घटले आहे. लाल किल्ल्यावरील छतावर गेल्या अनेक वर्षापासून जमा झालेली २५ लाख किलोग्राम माती आणि धुळ पुरातत्व विभागाने साफ केल्याने लाल किल्ल्याचे वजन कमी झाले आहे.

दिल्लीतील हवेमधील धुळीचे प्रमाण गेल्या काही वर्षामध्ये वाढले आहे. तसेच गेल्या महिन्यात दिल्लीला धुळीच्या वादळाचाही तडाखा बसला. पुरातत्व विभागाला लाल किल्ल्यावर अनेक ठिकाणी दोन मिटरपेक्षा जास्त जाड धुळीचा थर मिळाला. धुळीच्या वाढत्या वजनामुळे लाल किल्ला कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता, म्हणून किल्ल्यावरील हे वजन कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे पुरातत्व विभागाने म्हटले. ज्या भागातून धुळीचा थर काढण्यात आला त्याच भागातून पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी भाषण करतात.

सात महिने चालणार काम

लाल किल्ल्यावर सुरू असलेले डागडुजीचे काम सात महिने चालणार आहे. याच अंतर्गत लाल किल्ल्यामध्ये पिण्याचे पाणी आणि इतर सार्वजनिक सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. तसेच मुगलकाली पेंटींगसाठी भिंतीवर लावण्यात आलेले प्लास्टरही हटवण्यात येणार आहे. पेंटिंगला नुकसान पोहोचू नये म्हणून अत्यंत सावधगिरीने हे प्लास्टर काढण्यात येणार आहे. या सर्व डागडुजीला तब्बल ६० कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आहे.