ममतादीदी बिथरल्या, पराभवाचे चिंतन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जीं यांच्या गडाना खिंडार पाडत 18 जागा पटकावल्या. भाजपच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे ममतादीदी बिथरल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या या घसरलेल्या प्रदर्शनावर चर्चा करण्यासाठी दीदींनी शनिवारी नेत्यांची बैठक बोलावली आहे.

कालीघाट येथील ममतांच्या निवासस्थानी तृणमूलचे नेते विचारमंथन करणार आहेत. या बैठकीला सर्व वरिष्ठ नेत्यांनी हजर राहण्याचे आदेशच दीदींनी दिले आहेत. तृणमूलच्या आमदारांनाही बोलावले आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. पश्चिम बंगालमधील मतदानाचा प्रत्येक टप्पा हिंसाचार झाल्यामुळे देशभरात चर्चेचा विषय होता. अशा स्थितीत भाजपने 42 पैकी 18 जागा खिशात घातल्या. तृणमूलच्या वाट्याला अवघ्या 23 जागा आल्या आहेत. दीदींसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

दोन वर्षांनी विधानसभा निवडणूक

पश्चिम बंगालमध्ये दोन वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे दीदींची चिंता वाढली आहे. कालच्या लोकसभा निकालानंतर प्रतिक्रिया देताना ममतांनी ट्विट केले होते की, सर्व हरणारे लूजर्स नाही. आम्ही पूर्ण समीक्षा करू. त्यामुळे शनिवारी होणारी बैठक विधानसभेच्या दृष्टीने चिंतन बैठक असेल.