बंगालच्या खाडीत सितरंग चक्रिवादळ, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालच्या उपसागरात सितरंग नावाचं चक्रिवादळ तयार झालं असून ते वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे हवामान विभागाने पश्चिम बंगालसहित अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या राज्यांमध्ये बिहार, बंगाल, ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.

हवामान विभागानुसार, पश्चिम मध्य आणि त्याच्या बाजूला असलेल्या बंगालच्या उपसागरात गेल्या सहा तासात जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचं रुपांतर 15 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या चक्रिवादळात झालं आहे. त्याचा थेट प्रभाव बिहारसह, पश्चिम बंगाल आणि पुरी, जगतसिंहपूर, केंद्रपाडा, भद्रक, बालेश्वर, मयूरभंज, जाजपूर, क्योंझर, कटक आणि खुर्दा या ओडिशातील किनारी जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे एनडीआरएफ आणि पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, समुद्राच्या नजीक राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.