घरात एकटे राहात असाल आणि कोरोना झाला तर काय कराल ? वाचा ‘प्लान B’

जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हल्ली नोकरी-व्यवसायानिमित्त बरेच जण दुसऱ्या शहरात स्वतंत्र घर घेऊन राहतात. अशा वेळी तुमचे कुटुंबीय तुमच्या सोबत नसतात. या कठीण काळात तुम्हाला कोरोना झाला, तर घाबरून जाऊ नका!

अशा लोकांकरिता ‘प्लान B’ची गरज आहे. घरात एकट्या राहणाऱ्या महिला आणि पुरुषांचा आरटीपीसीटी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर असे लोक घरीच चेकलिस्ट तयार करून कोविड टूल किट तयार ठेवू शकतात. हे प्लान B कसे तयार करायचे ते पाहा?

अशावेळी शेजारी, काही मित्र, किराणा दुकानदार, मेडिकल स्टोअर या सगळ्यांच्या संपर्क क्रमांकांची यादी तयार ठेवा. गरजेच्या वेळी त्यांना फोन करून तुम्ही त्यांची मदत मिळवू शकता.

जर तुमच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असेल आणि तापही नियंत्रणात असेल तर तुम्ही घरी राहूनच काळजी घेऊ शकता. यावेळी अशा डॉक्टरांची मदत घ्या जे तुम्हाला कोविडला प्रतिबंध करण्यासाठी उपचार देऊ शकतात.

घरगुती खानावळीतून ताजे जेवण मिळेल आणि ते तुमच्या दारापर्यंत पोहोचवू शकतात. अशा घरगुती खानावळीतूनच अन्नपदार्थ मागवा.

आपत्काळात घरात ओट्स, उपमा आणि खिचडी यासारखे रेडी टू ईट यासारख्या खाद्यपदार्थांचा साठा घरी करून ठेवा. पाण्याचा बाटल्यांचा साठाही घरी करून ठेवू शकता.

पॅरासिटामॉल, बीटाडीन (गुळण्या करण्याकरिता), थर्मामीटर, खोकल्याचे औषध, पल्स ऑक्सीमीटर, विटॅमिन्स अशा प्राथमिक औषधांचा एक महिन्याचा साठाही घरात करून ठेवू शकता. बेसिक प्रथमोपचार किटही घरात आणून ठेवा. महिलांनी घरी जास्तीचे सॅनिटरी नॅपकिन्स आणून ठेवावेत.

बँकेच्या खात्यात पैसे शिल्लक ठेवा. तुमची विमा पॉलिसी असेल तर तिचे नियम नीट लक्षात घ्या. आजारी असल्यामुळे घराबाहेर पडता येत नसेल तेव्हा एखाद्या कुटुंबाकडून किंवा मित्राकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते, अशा मित्राला कळवा.

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम ठेवायचा प्रयत्न करा. जर तणावग्रस्त स्थितीत असाल तर स्वत:ची निगा कशी राखावी ? याबाबत समुपदेशकाकडून माहिती घ्या. कार्यालयीन काम करणाऱ्या व्यक्तिंनी आपल्या कार्यालयाकडून रुग्णालयात दाखल होण्याकरिता, रुग्णवाहिका, ऑक्सिजन यासाठी मदत मिळण्याचे काय नियोजन याबाबत माहिती मिळवावी आणि गरज पडल्यास त्याचा वापर करावा.

ऑक्सिजन, रुग्णवाहिका यासारख्या क्रिटिकल केयर सर्विसेसचे दूरध्वनि क्रमांक याची माहिती करून घ्या.
घरात असलेल्या कोरोना रुग्णांची काळजी घेणारे, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती मिळवून ठेवा. आधीच माहिती मिळवून ठेवली तर ऐनवेळी याचा फायदा तुम्हालाच होऊ शकेल.
घरात पाळीव प्राणी असेल तर तुमच्या आजारपणात त्याची काळजी आणि जबाबदारी कोण घेऊ शकेल, याकरिता पेट हॉस्टेलचा शोध घेऊ शकता.

 

आपली प्रतिक्रिया द्या