
व्हॉटसअॅपवर कधी कधी अनोळखी नंबरवरून गुड मॉर्निंगचा मेसेज येतो. काहींना त्या मेसेजना रिप्लाय द्यायची इच्छा होते. पण, जर असं केलं तर लाखोंचं नुकसान होऊ शकतं. बेंगळुरू येथील एका माणसासोबत नेमका हाच प्रकार घडला आहे.
बेंगळुरू येथील गोविंदपुरा भागात राहणाऱ्या एका माणसाला गेल्या दोन वर्षांपासून व्हॉट्सअॅपवर गुड मॉर्निंगचे मेसेज येत होते. एका विशिष्ट नंबरवरून ते येत असत. काही दिवसांपूर्वी याच नंबरवरून पुन्हा एक गुडमॉर्निंगचा मेसेज आला.
8 ऑक्टोबर रोजी देखील त्यांना असाच मेसेज आला होता. त्याला रिप्लाय केल्यानंतर त्यांना एका व्यक्तिचा मेसेज आला. या व्यक्तिने स्वतःचा पत्ता वगैरे तपशील दिले. काही काळाने ओळख वाढली असं समजून पीडित व्यक्ती या मेसेजवाल्या व्यक्तिने दिलेल्या पत्त्यावर भेटायला गेली.
त्या पत्त्यावर राहणाऱ्या आरोपीसोबत तीन अन्य लोक होते. या तिघांनी त्याला आपण पोलीस असल्याची बतावणी केली आणि पीडित व्यक्तिवर ड्रग तस्कर असल्याचा आरोप केला. त्याला अटकेची भीती घालून त्यांनी त्याच्याकडून मोबाईल अनलॉक करून घेतला, क्रेडिट कार्डही मागून घेतलं.
मग त्याला तिथेच बंद करून ते फरार झाले. काही वेळाने त्याने स्वतःची सुटका केली आणि तो घरी पोहोचला. तेव्हा त्याच्या खात्यातून दोन व्यवहार झाले असून एकूण 5 लाख रुपये काढले गेल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने पोलिसात याची तक्रार केली असून पुढील तपास सुरू आहे.


























































