वर्तमानपत्रांच्या खालील भागात रंगीबेरंगी बिंदू का असतात? जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकांना सकाळी उठल्यावर चहा पिताने वर्तमानपत्र वाचण्याची सवय असते. सकाळी सकाळी आपले शहर, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि विदेशात नक्की काय घडतंय याबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. मात्र वर्तमानपत्र वाचताना तुमचे लक्ष सर्वात खाली असणाऱ्या रंगीबेरंगी बिंदूंवर गेलंय का? गेलंही असेल, पण हे बिंदू नक्की कशासाठी आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना, मग चला जाणून घेऊया.

वर्तमानपत्रात तुम्हाला प्रत्येक पानावर हे वेगवेगळ्या रंगाचे चार बिंदू दिसतील. यांना कलर रजिस्ट्रेशन मार्क्स म्हणतात. हे रंग अनुक्रमे निळा, गुलाबी, पिवळा आणि काळा अर्थात Cyan, Magenta, Yellow, Black (CMYK) असे असतात.

“CMYK” हा शॉर्ट फॉर्म तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल. यातील एक्सपर्टना त्याबद्दल वेगळ्याने सांगायची गरज नाही. हे बेस कलर आहेत. वर्तमानपत्रामध्ये तुमच्या नजरेस पडणारा कोणताही रंग घ्या तो याच चार रंगांच्या कॉम्बीनेशनने बनवला जातो. प्रिंटींग करताना प्रिंट योग्य जागी आणि एका रेषेत आहे ना हे जाणून घेण्यासाठी या चार रंगांची मदत होते.

वर्तमानपत्र छपाईसाठी ऑफसेट प्रिंटींग टेक्नोलॉजी वापरतात, ज्यामध्ये प्रत्येक रंगासाठी ठराविक प्लेट्स किंवा फिल्म्स वापरून त्यांची प्रत्येक पानावर स्वतंत्र्यरित्या प्रिंटींग केली जाते. रंग एकमेकांमध्ये मिसळू नये तसेच स्वच्छ आणि अचूक प्रिंट (फुल कलर फोटो) यावी यासाठी या चार रंगाच्या चार प्लेट्स/फिल्म्स पानावर एकाच ठिकाणी समांतर रांगेत असणे गरजेचे असते.प्रत्येक प्लेट/फिल्मवर स्वत:चा एक मार्क (खुण) असते.

जर कधी तुम्हाला एखादा रंग वेगळा वाटला, तसेच रंगसंगती काहीशी वेगळी वाटली तर तुम्ही या चार कलर रजिस्ट्रेशन मार्क्सचा संदर्भ घेऊ शकता. ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की कोणता रंग त्या ठिकाणी वापरण्यात आला आहे. या कलर बिंदूचा आकार देखील वेगवेगळा असतो. कधी तुम्हाला ते गोलाकारात दिसतील, कधी हार्ट शेपमध्ये, कधी स्टारच्या आकारात, तर कधी चौकोनी आकारातही दिसतील. पण या सगळ्यांमागचं कारण मात्र एकच आहे.