इंजिनियर पतीची गोळ्या झाडून हत्या, प्रियकराच्या मदतीने काढला काटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

पत्नी व तिच्या प्रियकराच्या प्रेमसंबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा त्याच्या पत्नीने प्रियकराच्या साथीने काटा काढला आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये हा प्रकार घडला असून पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

मिर्झापूर येथील पटेहरा कालव्याजवळ 25 मार्च रोजी एका इंजिनियरची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. या इंजिनियरच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने कट रचून हि हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. महिलेचा प्रियकर आणि त्याच्या एका साथीदाराने हि हत्या केल्याची दोन्ही आरोपींनी कबुली दिली आहे. या हत्येत वापरलेले पिस्तुल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

सुलतानपूर येथील बलिया येथे राहणारे शनिलेश सिंह हे वाराणसीच्या जीएनडी कंपनीमध्ये मेंटेनन्स इंजीनियर होते. 25 मार्च रोजी ते मदिहान भागातील एका बँकेतून आपले काम संपवून दुचाकीवरून दुसऱ्या बँकेत जात होते. यावेळी वाटेत भरदिवसा त्यांची कालव्याजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर मृत व्यक्तीचा भाऊ मिथिलेश सिंग याच्या तक्रारीच्या आधारे आयपीसी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी काडतुसे जप्त केली.

त्यानंतर तपासाच्या आधारे पोलिसांनी तहसील तिराहा जवळून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांना पकडले. यावेळी त्यांची चौकशी केली असता विशाल राय आणि लवकुश वर्मा या दोघांनी हत्येमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली.

पत्नीने प्रियकरासह रचला हत्येचा प्लॅन

आरोपी विशाल राय याने सांगितले की, त्याचे इंजिनिअर शनिलेश सिंह यांच्या पत्नीसोबत गेल्या 8 वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. शनिलेश सिंह यांना याबद्दल माहीत होते. प्रेमसंबंधांच्या आड येत असल्याने शनिलेशच्या पत्नीने प्रियकर विशाल सोबत पतीच्या हत्येचा कट रचला. यासाठी विशालने त्याचा मित्र लवकुश यालाही सोबत घेतले. त्यानंतर विशाल आणि लवकुश यांनी सापळा रचून पटेहरा कालव्याजवळ शनिलेश सिंग यांची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.