
उल्हासनगर येथे राहणाऱया प्रियांका गुप्ता या 32 वर्षीय महिलेने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. मात्र ही महिला संरक्षक जाळीवर पडली. पोलिसांनी तातडीने तिला ताब्यात घेतले. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
8 डिसेंबर रोजी चक्क मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरू असणाऱया निर्मला ज्यूस सेंटरवर मध्यवर्ती ठाण्याचे पोलीस कारवाई करण्यास गेले होते. तेव्हा ज्यूस सेंटरचे मालक पवन गुप्ता, पवनची पत्नी प्रियांका गुप्ता आणि नीता आवाडे या महिलेने पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन जात असताना त्यांनी पोलीस वाहनांच्या काचा फोडून स्वतःला जखमी करण्याचा प्रयत्न केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या विरुद्ध पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी दुसऱया दिवशी प्रियांका गुप्ता आणि नीता आवाडे यांची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र पवन ऊर्फ अजित गुप्ता याला न्यायालयाने जामिन नाकारल्याने त्याची आधारवाडी जेलमध्ये रवानगी करण्यात आली. प्रियंका गुप्ता हिने तिच्या पतीला जामीन मिळावा यासाठी खुप प्रयत्न केले.त्यात अपयश येत असल्याने ती दोन तीन दिवसापासून मंत्रालय गाठत आहे. मात्र तिला प्रतिसाद मिळत नसल्याने प्रियंकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या आत लावलेल्या संरक्षण जाळीवर प्रियंकाने उडी घेतल्याने तिचा जीव वाचला आहे. सध्या प्रियंकाला मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ करत आहेत.
याबाबत उल्हासनगर मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्याशी विचारणा केली असता, मंत्रालयात आत्महत्तेचा प्रयत्न करणारी प्रियंका गुप्ता ही ज्युससेन्टर चालक पवन उर्फ अजित गुप्ता याची पत्नी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

























































