
सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क
फिश पेडिक्युअर हा तसा नवीन ट्रेंड नाही. गेल्या दहा वर्षांत तो हिंदुस्थानात चांगलाच रुजला आहे. पाय गुळगुळीत, स्वच्छ होतात असं म्हणत अनेक स्पा सेंटर्स फिश पेडिक्युअरची जाहिरात करत असतात. पण, अमेरिकेतल्या एका महिलेला मात्र फिश पेडिक्युअर चांगलंच महागात पडलं आहे. कारण, फिश पेडिक्युअर केल्यानंतर तिच्या पायाची नखंच नाहीशी झाली आहेत.
न्यू यॉर्क येथे एका महिलेच्या पायाची नखं अचानकपणे गळून पडायला लागली. तिने त्वरित डॉक्टरकडे धाव घेतली. तिच्या डॉक्टरने तिची तपासणी करून काही चाचण्या केल्या. मात्र सर्व चाचण्या सामान्य आल्या होत्या. तसंच वर्षभरापूर्वीचा तिचा वैद्यकीय इतिहासही अत्यंत सामान्य होता. अशा परिस्थितीत तिच्या नखांच्या गळण्याचं कारण डॉक्टरला कळत नव्हतं. शेवटी त्यांनी तिच्या गेल्या काही महिन्यात केलेल्या गोष्टी विचारल्या. त्यावेळी तिने आपण काही दिवसांपूर्वी फिश पेडिक्युअर केल्याचं सांगितलं.
मग तिच्या डॉक्टरने नखांच्या विशिष्ट चाचण्या केल्या आणि तिला ‘ओनिकोमॅडीसिस’ हा नखांचा आजार झाल्याचं निदान केलं. या आजारात रुग्णाच्या नखांची वाढ ज्या पेशींमधून होते, त्या पेशी कमकुवत होतात. त्यामुळे नखं गळून पडतात. महिलेने जेव्हा फिश पेडिक्युअर केलं, तेव्हा माशांमुळे तिच्या नखांच्या आसपासच्या पेशींनाही इजा झाली असावी. त्यामुळे तिची नखं गळून पडायला सुरुवात झाली, असा निष्कर्ष डॉक्टरने काढला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, फिश पेडिक्युअरमुळे नक्की काय फायदा होतो, ते अजूनही प्रयोगाअंती सिद्ध झालेलं नाही. तसंच ज्या पाण्यात मासे होते, त्या पाण्याच्या शुद्धतेचीही खात्री देता येत नाही. त्यामुळे फिश पेडिक्युअर केल्याने संसर्गजन्य त्वचाविकारही होऊ शकतात.
काय आहे फिश पेडिक्युअर?
मध्य पूर्व देशांमध्ये गर्रा रुफा या नावाने प्रसिद्ध असलेले मासे सोरायसिस या त्वचाविकारावर उपचार म्हणून वापरला जातो. सामान्य भाषेत याला डॉक्टर फिश म्हणतात. सोरायसिसमध्ये रुग्णाच्या त्वचेवर असणारे मृतत्वचेचे पापुद्रे हे मासे खातात आणि त्यांची त्वचा गुळगुळीत होते. मात्र यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते, हे मात्र सिद्ध झालेलं नाही. तसंच काही प्राणीप्रेमी या गोष्टीला विरोधही करतात. कारण माशांनी जास्तीत जास्त लोकांना पेडिक्युअर द्यावं यासाठी त्यांना कित्येक काळ उपाशीही ठेवलं जातं. तसंच अशा प्रकारचे कोणतेही उपचार हे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जातात. पार्लर किंवा सलॉनमध्ये उपचारांची आणि स्वच्छतेची कोणतीही खात्री देता येत नाही, असं त्वचारोगतज्ज्ञांचं म्हणणं आहे.




























































