
सामना ऑनलाईन । मुंबई
गुजरातमधून मुंबईत येत असलेल्या एका महिला प्रवाशाची चालत्या एक्सप्रेसमध्ये ट्रेनमध्ये हत्या हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. देरियादेवी चौधरी (40) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून भुज-दादर सुपरफास्ट एक्सप्रेसने त्या प्रवास करत होत्या. शुक्रवारी दुपारी 12.10 वाजता ट्रेन जेव्हा दादरला पोहोचली, त्यावेळी आरपीएफ जवानांना महिला कोचमध्ये चौधरी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. या हत्येला रेल्वेतील ढिसाळ सुरक्षा व्यवस्था जबाबदार असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
शुक्रवारी सकाळी 8.21 वाजता सुरत स्थानकातून भुज-दादर सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीने चौधरी मुंबईतील नातेवाईकांकडे येण्यासाठी निघाल्या होत्या. 20 बर्थच्या महिला कोचमध्ये त्या गाडीत बसल्या त्यावेळी जेमतेम 7-8 महिला प्रवासी होते आणि ते सर्व बोरिवलीला उतरले. त्यामुळे बोरिवली आणि दादरच्या दरम्यान चौधरी एकट्या असताना ही घटना घडल्याची शक्यता जीआरपीने व्यक्त केली आहे. चौधरी एकट्या असल्याचा फायदा घेत आरोपी बोरिवलीहून ट्रेनमध्ये चोरीच्या उद्देशाने चढला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. चौधरी यांच्या गळ्यावर, हातावर आणि छातीवर धारदार शस्त्राचे वार करून त्यांच्या गळ्यातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. तसेच त्यांच्या मृतदेहावरील कपडे देखील नव्हते. या प्रकरणी जीआरपीने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासठी रुग्णालयात पाठवला असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीला शोधण्यासाठी पोलीस बोरिवली आणि दादर येथील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
जीआरपीला चौधरी यांच्याकडीत एका कागदावर त्यांच्या बहिणीच्या पतीचा नंबर मिळाला. बुधवारी त्यांनी बहिणीला फोन करून मुंबईत येत असल्याचे सांगीतले होते. चौधरी यांच्याकडील फोन बंद असल्यामुळे त्यांनी तो नंबर कागदावर लिहून घेतला होता. चौधरी वर्षातून किमान दोन वेळा मुंबईतील नातेवाईकांकडे येत असत. त्यांचे पती सुरतमध्ये एका कपड्याच्या दुकानात काम करतात. त्यांना 3 मुलं असून मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तर एक मुलगी पदवीच्या शेवटच्या वर्षात असून दुसरी मुलगी बारावीत शिकत आहे. मुंबईत वडाळा येथे त्यांची बहिण राहत असून भाऊ नवी मुंबईत राहतो. शुक्रवारी सकाळी पतीने देरियादेवी यांना सुरत स्थानकातून गाडीत बसवून दिले. मात्र त्यांचा हा प्रवास शेवटचा प्रवास ठरला.

































































