महिलेच्या कानातील दागिना चोरीचा प्रयत्न, आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सासूसोबत पायी चाललेल्या महिलेच्या कानातील सोन्याचा दागिना ओढून चोरण्याचा प्रयत्न करणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 16 जानेवारीला संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास संतोषनगर, कात्रज परिसरात घडली.

गणेश हनुमंत कदम (वय 23, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी छाया बोरेकर (वय 38, रा. जाधवनगर, कात्रज ) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया आणि त्यांच्या सासू 16 जानेवारीला संतोषनगर परिसरातून रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने छाया यांच्या कानातील सोन्याचा दागिना हिसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने आरडाओरड केल्यामुळे चोरटा पसार झाला होता.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार माहिती काढून गणेश कदम याला अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांच्या पथकाने केली.