
बिअर पिण्याची तलफ आल्याने पवईतील एका तरुणीने ऑनलाईन बिेअरची ऑर्डर दिली मात्र ही ऑर्डर तिला भलतीच महागात पडली आहे. बिअरचे 420 रुपयांचे बिल ऑनलाईन भरल्यानंतर तिच्या खात्यातील तब्बल 87 हजारप रुपये उडाले आहेत. याप्रकरणी तिने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पवई भागात राहणाऱ्या या तरुणीला बिअर पिण्याची तलफ आली. त्यामुळे तिने घरपोच डिलिव्हरीसाठी गुगलवरून आसपासच्या वाईन शॉपचा नंबर शोधला. गुगल सर्चमध्ये तिला पवईच्या स्टार वाईन शॉपचा नंबर मिळाला. तिने त्या नंबरवर फोन करून तीन बिअर मागवल्या. त्याचे तिचे 420 रुपये बिल झाले. त्यानंतर समोरील व्यक्तीने तिच्याकडे तिचा युपीआय आयडी मागितला व तिला मोबाईल वॅलेटमधून 420 रुपये पाठवायला सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार तिने 420 रुपये पाठवले मात्र त्या पाठोपाठ तिच्या खात्यातून 29 हजार रुपये देखील डेबिट झाले. तिने पुन्हा त्या व्यक्तीला फोन करून पैसे डेबिट झाल्याचे कळवले. त्यावेळी त्याने ते चुकून झाले असून थोड्या वेळात तुमचे पैसे परत मिळतील असे सांगितले. मात्र यात काहीतरी काळंबेरं असल्याचे लक्षात आलं. त्या दरम्यान दोन ट्रान्झॅक्शनमध्ये तिच्या खात्यातून 58 हजार रुपये डेबिट झाले. त्यानंतर ती तरुणी तत्काळ त्या वाईन शॉपवर गेली मात्र तो नंबर त्या वाईन शॉपचा नसल्याचे दुकानदाराने तिला सांगितले. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्या तरुणीने तत्काळ पवई पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस सध्या त्या क्रमांकावरून चोरांचा शोध घेत आहेत.
याआधी 11 ऑगस्टला देखील पवई येथील या स्टार वाईन शॉपच्या क्रमांकावर फोन केल्य़ाने एका वैमानिकाच्या खात्यातील 38 हजार उडाले होते. तर जुलै महिन्यात खार मधील एका तरुणाने ऑनलाईन दारू मागवल्यानंतर त्याच्याखात्यातील 35 हजार रुपये डेबिट झालेले.





























































