सोशल मीडियावर फोटो अपलोड करणे पडले महागात, महिला चोराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड येथील एका मॉलच्या शो रूममधून कपडे, चप्पल आणि दागिने चोरीप्रकरणी शुभांगी नावाच्या तरुणीला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. मॉलमधून चोरलेले कपडे घालून तिने तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. त्या फोटोवरून तपास करून पोलिसांनी शुभांगीला बेडय़ा ठोकल्या आणि न्यायालयात हजर केले.

तक्रारदार हे मॉलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्या दुकानात शुभांगी गेल्या ऑगस्ट महिन्यापासून कामाला होती. डिसेंबर महिन्यात शो रूममधील मालाची तपासणी केली तेव्हा काही महागडे कपडे, दागिने आणि चपला कमी असल्याचे निदर्शनास आले. याबाबत मॅनेजरने शुभांगीकडे विचारणा केली तेव्हा शुभांगीने चोरीबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी शुभांगीने सोशल मीडियावर तिचे फोटो अपलोड केले होते. हा प्रकार एका जणाच्या लक्षात आला. त्याने याची माहिती मॅनेजरला दिली. मॅनेजरने शुभांगीला कपडय़ाबाबत विचारणा केली तेव्हा शुभांगीने आपण नुकसानभरपाई देऊ असे सांगितले होते, मात्र तिने नुकसानभरपाई दिली नव्हती. चोरीप्रकरणी मॅनेजरने बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी शुभांगीविरोधात गुन्हा दाखल केला. तिच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. पोलिसांनी शुभांगीला ताब्यात घेऊन अटक केली.