ओव्हरटाईममुळे होतोय खासगी आयुष्यावर परिणाम, महिलेने घेतली न्यायालयात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंपन्यांमध्ये कामाचा ताण वाढल्याने ओव्हरटाईम काम करावे लागते त्यात काही नवीन नाही. मात्र त्याने कर्मचाऱ्यांच्या खासगी आयुष्यावर परिणाम होत आहे. असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने ओव्हरटाईमुळे खासगी आयुष्यावर परिणाम होत असल्याने न्यायालयात धाव घेतली आणि खटला जिंकलीही. न्यायालयाने कंपनीला त्या महिलेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

ही घटना चीनमधील आहे. ली असे महिलेतचे नाव असून ती आयटी कंपनीत काम करायची. जिथे ऑफिसवेळ संपल्यानंतरही अनेक मेसेजना प्रतिसाद द्यावा लागायचा. त्यामुळे तिच्या खासगी आयुष्यावरही त्याचा परिणाम होत होता. अखेर महिलेने दाद मागण्यासाठी कोर्टाचे दार ठोठावले. वियॉनच्या वृत्तानुसार, चीनच्या स्थानीय न्यायालयाने निर्णय देताना म्हंटले आहे की, आयटी कंपनी महिलेला नुकसान भरपाी म्हणून 30 हजार युआन म्हणजेच 3 लाख 55 हजार रूपये द्यावे लागणार आहे. महिलेने दावा केला आहे की, एका वर्षाच्या आत दोन हजार तास तिने अधिक काम केले आहे. यापैकी अधिक वेळ तिचा मेसेजना उत्तर द्यायला गेला. न्यायालयाने महिलेच्या बाजूने निर्णय दिल्याने चीनमधील कामगार वर्गाचा मोठा विजय मानला जात आहे. चीनमधील कामगार कायदे अयोग्यरित्या लागू केले जातात आणि कामगारांचे अनेकदा शोषण केले जाते.

चीनमध्ये कर्मचाऱ्यांकडून आठवड्यातून 7 दिवस 24 तास मेसेजवर उपलब्ध होण्याची अपेक्षा केली जाते. आता या निर्णयाकडे उर्वरित चिनी कंपन्यांसाठी धडा म्हणून पाहिले जात आहे. विशेषत: जे कर्मचाऱ्यांना मेसेजिंग अॅपवर 24 तास उपस्थित राहण्याची सक्ती करतात. त्यामुळे कदाचित ती यापुढे संपर्क करण्यासाठी दुसरा मार्ग अवलंबेल. या निर्णयानंतर व्हॉट्सअॅप आणि व्हीचॅट सारखे मेसेजिंग अॅपचे लीगल स्टेटसवरुन वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे.