कर्ज फेडण्यासाठी ती करत होती चोऱया 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पतीच्या उपचारासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी लोकलमध्ये चोऱया करणाऱया महिलेला रेल्वे गुन्हे शाखेने अटक करून वडाळा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलेच्या अटकेमुळे वडाळा रेल्वे पोलिसांनी चोरीच्या दोन गुन्ह्याची उकल केली आहे.

अटक महिला ही चेंबूर येथे राहत असून तिने पतीच्या उपचारासाठी काही कर्ज घेतले होते. उपचारादरम्यान गेल्या वर्षी महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. घरची परिस्थिती हलाखीची त्यातच डोक्यावर असलेल्या कर्जामुळे तिने लोकलमध्ये चोऱया करायचे ठरवले.

गेल्या आठवडय़ात महिलेने कुर्ला रेल्वे स्थानकात एका महिलेची गळय़ातील सोनसाखळी चोरून नेली होती. चोरीप्रकरणी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. शनिवारी रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने कुर्ला रेल्वे स्थानकात सापळा रचला होता. तेव्हा एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरताना अटक महिलेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.