
कौटुंबिक जबाबदाऱयांमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या महिलांना पुन्हा करीअरची संधी पर्सिस्टंट सिस्टम्सने दिली आहे. पंपनीने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला असून विंग्स (WINGS) या उपक्रमांतर्गत महिलांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे.
कौशल्य विद्यापीठातर्फे राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली जाणार असून विद्यापीठाने अलीकडेच इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री 4.0, बिझनेस अॅनालिटिक्स आणि बीबीए रिटेलसारख्या वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांतर्गत एमटेकसारखे उच्च कौशल्यांचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे सर्व अभ्यासक्रम औद्योगिक भागीदारांशी संलग्न असून ते पूर्ण करणाऱयांना प्रमाणपत्रदेखील प्रदान करण्यात येणार आहेत.
हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पर्सिस्टंट सिस्टम्सद्वारे नियुक्त केले जाईल, अशी माहिती कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्व पालकर यांनी दिली. या उपक्रमांतर्गत कौटुंबिक जबाबदाऱयांमुळे करीअरपासून 1 ते 4 वर्षे दूर राहिलेल्या आणि तांत्रिकदृष्टय़ा पात्र असलेल्या महिलांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. केवळ कौटुंबिक जबाबदाऱयांमुळे अनेक महिला चांगल्या करीअरपासून वंचित राहतात. त्यांच्यात योग्य क्षमता असूनही त्यांची प्रगती होऊ शकत नाही. या दृष्टीने विंग्स हा या तंत्रकौशल्ये आत्मसात केलेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठीचा एक सामाजिक उपक्रम आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या https://mssu.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.





























































