Women Wrestlers Sexual Harassment Case नीरज चोप्रा, कपिल देवही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मैदानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणप्रकरणी राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरुद्ध सुरू असलेले कुस्तीपटूंचे आंदोलन आजही सुरूच आहे. कुस्तीपटूंचा देशभरातून पाठिंबा वाढत असून आता ऑलिम्पिकन सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि क्रिकेटमध्ये देशाला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देवही (Kapil Dev) समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. नीरज चोप्रा याने एक ट्विट करत याप्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी करून खेळाडूंना न्याय देण्याची मागणी केली आहे.

नीरज चोप्रा याने शुक्रवारी सकाळी ट्विट करत लैंगिक शोषण प्रकरणी न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या कुस्तीपटूंना समर्थन दिले. खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याचे पाहून वाईट वाटतंय. देशाचे प्रतिनिधीत्व आणि आपल्याला अभिमान वाटावी अशी कामगिरी करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे एक देश म्हणून आपली जबाबदारी आहे, मग तो खेळाडू असो किंवा नसो, असे नीरज चोप्रा याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे देखील वाचा – महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण- पी. टी. उषांचा सवाल, बजरंगचा पलटवार!

तो पुढे म्हणतो, जे घडत आहे ते घडायला नको होते. हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा असून तो निःपक्षपणे आणि पादरर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. न्यायासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाई करणे आवश्यक आहे.

कपिल यांची पोस्ट

1983ला हिंदुस्थानला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनीही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. बजरंग पुनियासह विनेश फोगाट आणि अन्य कुस्तीपटूंच्या पत्रकार परिषदेचा फोटो कपिल यांनी आपल्या स्टोरीवर ठेवला असून याखाली ‘त्यांना कधी न्याय मिळेल का?’, असा सवाल उपस्थित केला आहे.

त्याआधी कुस्तीपटू रवी दहिया हा देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत उभा राहिला असून ट्विटरद्वारे त्याने समर्थन दर्शवले आहे. एक फौजी (जवान) आणि खेळाडू देशाची शान असतात आणि त्यांना सन्मान करणे प्रत्येक देशाचे कर्तव्य आहे, असे ट्विट त्याने केले.