मीच मला उमगले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जिजाऊ आईसाहेब या व्यक्तिरेखेने मला इतकं काही देऊ केलं की, ते नेमकं शब्दातही मांडता येणार नाही. दरवेळी ही भूमिका करताना, किंबहुना जगताना ती मला दरवेळी नव्याने उमगत आणि उमलत जाते…’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी भूमिकेतून मिळालेली सकारात्मक ऊर्जा आणि संस्काराची शिदोरी उलगडली.

प्रत्येक भूमिका कलावंताला बरंच काही देऊन जाते आणि शिकवून जाते. आई जिजाऊंची भूमिका माझ्या आत खोलवर असण्याचा दरवेळी प्रत्यय आला. हे संस्कार कळत नकळत मुलामध्ये खोलवर झिरपताना बघून माझ्यातील आईला वेगळंच समाधान लाभतं.

प्रत्येक सीनआधी स्क्रिप्ट वाचताना जणू जिजाऊ आईसाहेब माझ्यासमोर बसल्यात असं कित्येकदा मला वाटायचं आणि त्यांच्या अस्तित्वाचा नुसता भाससुद्धा मला एक अनामिक सकारात्मक ऊर्जा देऊन जायचा.

आजवरच्या माझ्या अभिनय कारकीर्दीमध्ये निरनिराळ्या माध्यमांतून नानाविध भूमिका साकारायला मिळाल्या, पण अशी एक व्यक्तिरेखा जी मी शब्दशः जगले ती म्हणजे जिजाऊ आईसाहेब यांची. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते की, महाराष्ट्राच्या मातीतलं हे ओजस्वी व्यक्तिमत्त्व मला साकारायला मिळालं. एकदा नाही, तर अनेकदा आणि प्रत्येक वेळी जिजाऊ आईसाहेबांचं गारुड माझ्या मनावर अधिकाधिक गडद होत गेलं. इतकं कणखर, निर्भय, खंबीर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व खचितच इतिहासात सापडेल.

सामान्यपणे स्वप्न झोपेत पाहिली जातात, पण स्वराज्य स्थापनेचे स्वप्न जिजाऊ आईसाहेबांनी उघडय़ा डोळ्यांनी पाहिलं आणि ते आपल्या पुत्राकडून आणि त्याच्या सहकाऱयांकडून म्हणजे मावळ्यांकडून साकार करून घेतलं.

कौटुंबिक जीवनातील अनेक चढ-उतार त्यांनी मोठय़ा खंबीरपणे पचवले. मग स्वतःच्या वडिलांचा व भावाचा वध असो की स्वतःच्या पतीचे स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेत अनेकदा आलेले अपयश असो, त्या कधीही डगमगल्या नाहीत. स्वतःच्या दुःखांना कुरवाळत बसण्यापेक्षा सातत्याने त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी शिवबांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या मनात चेतना जागवण्याचं काम केलं व त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेचं बाळकडू पाजलं. तमाम मावळ्यांना प्राण हातावर घेऊन लढायला उद्युक्त केलं. आपल्या जन्मभूमीपेक्षा, मातीपेक्षा, धर्मापेक्षा जगामध्ये दुसरे काहीच मोठं आणि महत्त्वाचं नसतं या आणि अशा अनेक सुसंस्कारांचे संस्कार दिले. स्वतःच्या कौटुंबिक सुखसमाधानापेक्षा त्यांना रयतेच्या चेहऱयावरचा आनंद नेहमीच महत्त्वाचा वाटला आणि त्यातच त्यांनी सुख मानलं.

जिजाऊ आईसाहेबांचं महान व्यक्तिमत्त्व मला विविध लेखक, दिग्दर्शक आणि सहकाऱयांसोबत साकारायला मिळालं या गोष्टीचा मला प्रचंड आनंद आणि अभिमान आहे. त्या चित्रीकरणादरम्यानचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आजदेखील माझ्या स्मरणात आहे.

प्रत्येक सीनआधी स्क्रिप्ट वाचताना जणू जिजाऊ आईसाहेब माझ्या समोर बसल्यात असं कित्येकदा मला वाटायचं आणि त्यांच्या अस्तित्वाचा नुसता भाससुद्धा मला एक अनामिक सकारात्मक ऊर्जा देऊन जायचा.

पुष्कळदा असं होतं की, आपण एखाद्या कलाकृतीमध्ये एखादी भूमिका करतो आणि नंतर हळूहळू कालांतराने ते विस्मरणातदेखील जाऊ शकते, पण जिजाऊ आईसाहेबांची भूमिका माझ्या नसानसांत इतकी भिनली की, माझ्या मुलाला विराजसला जेव्हा जेव्हा त्याच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर मला जेव्हा कधी शिकवण द्यावीशी वाटली तेव्हा तेव्हा मला ही भूमिका माझ्या आत खोलवर असण्याचा दरवेळी प्रत्यय आला. माझ्या कारकीर्दीतील अनेक वळणे, चढ-उतार याविषयी विराजसशी मी नेहमीच बोलत असते. आमच्या संभाषणातून पुष्कळ गोष्टी त्याला स्वतःसाठी अमलात आणायला मदत होते. कळत नकळतपणे केलेले हे संस्कार आपल्या मुलामध्ये खोलवर झिरपताना बघून माझ्यातील आईला एक वेगळंच समाधान लाभतं.

 शब्दांकन : निनाद पाटील