अठराव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवली येथे घडली आहे. इमरूल इम्रान शेख असे या मृत कामगाराचे नाव असून घडल्याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बोरिवली पूर्व येथे इमारतीचे काम सुरू असून या ठिकाणी इमरूल हा काम करत होता. रविवारी सकाळी इमरूल अठराव्या मजल्यावर साफसफाईचे काम करत होता तेव्हा त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. हा प्रकार काही कामगारांच्या निदर्शनास आला. कामगारांनी त्याला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून इमरूलला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी आले. कामगारांना सुरक्षेच्या उपाययोजना न पुरवल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुह्यात अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.