
सामना ऑनलाईन । मॉस्को
२१व्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा थरार सध्या रशियामध्ये सुरू आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधीपासूनच स्पर्धेच्या विजेतेपदासाठीच्या प्रबळ नावांसाठीच्या संघांच्या नावांची चर्चा सुरू होती. परंतु प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र विश्वचषकावर आपले नाव कोरण्यात कोणता संघ यशस्वी होईल, हे सांगणे कठीण झाले आहे. परंतु स्टार फुटबॉलपटू आणि इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमने विश्वचषक कोण जिंकणार आहे याचे भाकीत वर्तवले आहे.
चीनमध्ये पार पडलेल्या एका फुटबॉल संदर्भातील कार्यक्रमाला डेव्हिडने उपस्थिती लावली होती. याचवेळी विश्वचषकाचा मानकरी कोण ठरेल या प्रश्नाला उत्तर देताना डेव्हिडने हे भाकीत व्यक्त केले आहे. डेव्हिडने सांगितले की, ‘ इंग्लंड आणि अर्जेंटिना या दोन बलाढ्य संघांमध्ये २१व्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवण्यात येईल.’
विश्वचषकाचा मानकरी कोण असेल, याचे भाकीत वर्तवताना डेव्हिड बेकम म्हणाला की, ‘विश्वचषकात सहभागी झालेल्या इतर संघांपैकी इंग्लंडचा संघ ताकदवान असून अनेक युवा खेळाडूंचा संघात सहभाग आहे. इंग्लंडने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात दमदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. दुसरीकडे अर्जेंटिना अद्याप यशस्वी अशी कामगिरी करू शकलेला नाही. परंतु येत्या काळात आपल्या प्रभावी खेळीने अर्जेंटिना स्पर्धेत आपले अस्तित्व कायम करेल. विश्वचषकाच्या अंतिम सामना इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्या रंगेल आणि यांच्यातील या रोमहर्षक लढतीत इंग्लंड विश्वचषकावर आपले नाव कोरेल.’































































