पृथ्वीवर राहणारा प्रत्येक दहावा माणूस धोक्याच्या छायेत, जागतिक हवामानशास्त्र संघटनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक तापमानवाढीमुळे हिमप्रस्तर वितळण्याचा आणि समुद्राची पातळी वाढण्याचा धोका जगाला भेडसावत आहे. जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO)ने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. जगातला दर 10 माणूस हा धोक्याच्या छायेत असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याचा धोका असून त्यामुळे घनदाट लोकसंख्या असणाऱ्या किनारपट्टीच्या शहरांमध्ये राहणाऱ्या सुमारे 90 कोटी लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होईल. म्हणजेच पृथ्वीवर राहणाऱ्या दर दहाव्या माणसावर धोक्याची टांगती तलवार असणार आहे. यात हिंदुस्थान, बांग्लादेश, चीन आणि नेदरलँड्स सारख्या देशांचा समावेश आहे.

मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक तापमानवाढीचं संकट ओढवलेलं आहे. जर ही वाढ 1.5 अंश सेल्सियसपर्यंत मर्यादित राहिली तर पुढील 2000 वर्षांत समुद्राची पातळी 2 ते 3 मीटरने वाढेल. जर ती वाढ 2 अंशांपर्यंत नियंत्रित केली गेली, तर समुद्राची पातळी 6 मीटर पर्यंत वाढेल. पण, जिथे ही वाढ 5 अंश सेल्सिअसपर्यंत नियंत्रित करण्यात आली तर पुढील 2 हजार वर्षांत समुद्राची पातळी 19 ते 22 मीटरपर्यंत वाढेल. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या शहरांवर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतील. त्यासोबत समुद्राची क्षारता, जलचर यांच्यावरही त्याचा दुष्परिणाम होईल.