
हिंदुस्थानात सध्या आयपीएलची रणधुमाळी सुरू आहे. पण बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेनंतर इंग्लंडमध्ये होणाऱया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलची तयारी आतापासूनच सुरू केली आहे.
हिंदुस्थानी संघातील कसोटी स्पेशालीस्टसाठी आयपीएलदरम्यान लाल डय़ुक चेंडू सरावासाठी देण्याची तयारी बीसीसीआयने दाखवली आहे. जेणेकरून कसोटी खेळणाऱया क्रिकेटपटूंना प्रतिष्ठsच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्याआधी पुरेसा सराव करता येईल.
अजिंक्य, पुजारा, शमी, भुवीला होणार फायदा
अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा हे कसोटी स्पेशालीस्ट आयपीएलमध्ये सहभागी होणार असले तरी प्रत्येक सामन्यात त्यांना अंतिम अकरामध्ये संधी मिळेलच असे नाही. तसेच मोहम्मद शमीलाही लाल चेंडूने गोलंदाजी करण्याचा सराव मिळायला हवा. दुखापतीमधून पुनरागमन करणारा भुवनेश्वर कुमार यानेही गेला बराच काळ कसोटी क्रिकेट खेळलेले नाहीए. त्यामुळे लाल चेंडूने सरावाचा या खेळाडूंना नक्कीच फायदा होणार आहे.
सरावासाठी वेळच नसणार
आयपीएल या टी-20 स्पर्धेचा अंतिम सामना 30 मे रोजी पार पडेल. याच कालावधीत हिंदुस्थानचे क्रिकेटपटू इंग्लंडला रवाना होतील. 18 ते 22 जून या कालावधीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे सरावासाठी हिंदुस्थानी क्रिकेटपटूंकडे कमी दिवस शिल्लक राहणार आहेत.
इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर जवळपास सात दिवसांचा विलगीकरणाचा अवधी असेल. याचा अर्थ टीम इंडियाला फक्त सात ते आठ दिवस सरावाला मिळणार आहेत. त्यामुळे आयपीएलदरम्यानच हिंदुस्थानी खेळाडूंना कसोटीमध्ये वापरल्या जाणाऱया लाल चेंडूचा सराव करण्यासाठी बीसीसीआयने पुढाकार घेतला आहे.



























































