वरळी बीडीडी पुनर्विकासात फ्लॅटसोबत पार्किंगही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशीयांसाठी आनंदाची बातमी आहे. पुनर्विकासानंतर या ठिकाणी उभ्या राहणाऱया टोलेजंग टॉवरमध्ये प्रत्येक रहिवाशाला प्रशस्त फ्लॅटसोबत आता स्वतंत्र पार्किंगची सुविधादेखील मिळणार आहे. यासंदर्भातला प्रस्ताव म्हाडा लवकरच राज्य शासनाकडे पाठवणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच प्रत्येक रहिवाशाला स्वतंत्र पार्किंग मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आशिया खंडातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठय़ा व राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते या पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे कामाचा पहिला टप्पा ऑगस्ट 2021 साली सुरू झाला असून या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. वरळीतील 121 चाळींचा पुनर्विकास करून 9689 सदनिका उभारण्यात येणार आहे. प्रत्येक रहिवाशाला 500 फुटाचे प्रशस्त घर मिळणार आहे.

 विकास नियंत्रण नियमावलीनुसार चार सदनिकांसाठी एक पार्किंग देणे बंधनकारक आहे, परंतु या ठिकाणी चार फ्लॅटसाठी दोन पार्किंग उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र पार्किंग मिळाले पाहिजे, अशी मागणी स्थानिकांकडून आता जोर धरू लागली. त्यादृष्टीने म्हाडानेदेखील हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच यासंदर्भात म्हाडातर्फे राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. ही मागणी मान्य झाल्यास सध्याचे सहा मजली पोडियम आठ मजल्यांचे केले जाईल. यासाठी सुमारे 400 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे, असेही अधिकाऱयाने सांगितले.

 वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील इमारत क्रमांक 1 मधील आठ विंगचे काम प्रगतिपथावर असून यापैकी डी आणि ई विंगचे 40 मजले पूर्ण झाले आहेत तसेच इतर सहा विंगचे संरचनात्मक काम प्रगतिपथावर आहे. इमारत क्रमांक 6 मधील 6 विंगपैकी ए, सी, डी, एफ या इमारतींच्या पायाचे काम सुरू आहे.