मिहीर शहाची हायकोर्टात धाव, कारवाईवर आक्षेप; हेबियस कॉर्पस याचिका दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळीत बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेणाऱ्या मिहीर शहाने तुरुंगातून सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मिहीर हा मिंधे गटाचा उपनेता राजेश शहाचा मुलगा आहे. पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा दावा त्याने हेबियस कॉर्पस याचिकेतून केला आहे. त्याच्या याचिकेवर 21 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

मिहीरने 7 जुलैला दारूच्या नशेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवली आणि वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली. त्यात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. मिहीरने गाडीखाली चिरडलेल्या कावेरी यांना निर्दयीपणे वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत फरफटत नेले होते. घटनेनंतर फरार झालेल्या मिहीरला 9 जुलैला विरारच्या रिसॉर्टमधून अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मागील महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर येथून सुटकेसाठी त्याने धडपड सुरू केली आहे. यासाठी जामीन अर्ज करण्याआधी त्याने पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्यातर्फे ऍड. नेहा पाटील यांनी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे.

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

मिहीरचा पिता राजेश शहा मिंधे गटातील पदाधिकारी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जवळचा सहकारी आहे. पोलिसांनी मिहीरला अटक करण्यात विलंब केल्याने मिंधे सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आरोपीची गय करणार नसल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात पोलीस कोठडीत असताना मिहीरला खासगी कारमधून न्यायालयात आणले होते. अशा स्थितीत पोलीस उच्च न्यायालयात नेमकी कोणती भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.