
एल्गार प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयएने) पुण्यातील कबीर कलामंचच्या सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना मुंबईत ताब्यात घेतले आहे बचाव पक्षाचे वकील मिहीर देसाई यांनी याला दुजोरा दिला आहे.
पुण्यातील शनिवारवाडा परिसरात 31 डिसेंबर 2017 रोजी पार पडलेल्या एल्गार परिषद आयोजनात नक्षलवादी संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत देशभरातून 12 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने हा तपास पुणे पोलिसांकडून एनआयएकडे दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सागर गोरखे आणि रमेश गायचोर हे कबीर कला मंच या संघटनेशी संबंधित आहेत. भीमा कोरेगाव येथील लढाईस 200 वर्ष पूर्ण झाल्यामुळे पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. परिषद आयोजनासाठी नक्षलवादी संघटनांनी आर्थिक पुरवठा करण्यासोबतच लोकांना चिथावणी दिल्याचा दावा तपास यंत्रणा यांनी केला आहे. त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात तुषार दामगुडे यांनी तक्रार दिली होती. रमेश गायचोर आणि सागर गोरखे यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वीही दोघांवर बेकायदेशिर प्रतिबंधक हालचाली कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये गायचोर आणि गोरखे महाराष्ट्र एटीएस समोर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात मे 2013 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. जानेवारी 2017 मध्ये दोघांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दोघांचा पुणे येथील शनिवारवाडा परिसरात झालेल्या एल्गार परिषदेशी संबध होता का? याबाबत पुढील तपासासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली.
एल्गार प्रकरणात कबीर कलामंचच्या गायचोर आणि गोरखे यांना एनआयएने शनिवारी चौकशीसाठी बोलवले होते. सोमवारी पुन्हा दोघे मुंबई येथे पुन्हा चौकशीसाठी गेल्यानंतर एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. तसेच दोघांनाही मुंबई येथील सत्र न्यायालयात मंगळवारी हजर करणार असल्याची माहिती सागर गोरखे यांच्या कुंटुंबियांना समजल्याचे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात एनआयएच्या कार्यालयातून फोन आल्याचेही कुटुंबियांनी सांगितले.
































































