सोशल मीडियावरील चिखलफेकीला कंटाळून डॉक्टरने आत्महत्या केली ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

केरळच्या कोल्लाम भागातील एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर तिथल्या वैद्यकीय क्षेत्रात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. अनूप कृष्णा (35 वर्षे) असे या डॉक्टरचे नाव आहे. अनूपने त्याच्या घरातील भिंतीवर SORRY असं लिहून आपले जीवन संपवले. या घटनेनंतर केरळमधील बरेच डॉक्टर अनूपला पाठिंबा दर्शवत पुढे आले आहेत. अनूप हा सोशल मीडियावरून होणाऱ्या चिखलफेकीमुळे व्यथित झाला होता असं सांगितलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका सात वर्षांच्या मुलीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता. अनूपने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले होते.  शस्त्रक्रियेदरम्यान तिचा मृत्यू झाला होता. यानंतर अनूपवर सोशल मीडियातून यथेच्छ टीका करण्यात आली होती. ही टीका सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. समाज माध्यमे न्यायालयासारखी वागायला लागली असल्याने केरळमधील डॉक्टर नाराज झाले आहेत. या प्रकाराला कुठेतरी आळा बसायला हवा अशी मागणी या डॉक्टरांनी करायला सुरुवात केली आहे.

अनूप हा हाडांशी संबंधित विकारांचा डॉक्टर होता. अनूपने एका 7 वर्षांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करण्याचे मान्य केले होते. कोरोना काळात या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यास अनूपपूर्वी एका डॉक्टरने नकार दिला होता. मात्र अनूपने आपलं कर्तव्य म्हणून शस्त्रक्रियेला होकार दिला. शस्त्रक्रियेपूर्वी मुलीला भूल देण्यात आली होती. मात्र शस्त्रक्रियेदरम्यानच तिला हृदयविकाराचा झटका आला होता. तिला तातडीने कोल्लामच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेण्यात आले. मात्र तिचा जीव वाचवण्यात अनूप आणि इतर डॉक्टरांना यश आले नाही. आपल्या मुलीच्या मृत्यूला अनूपच जबाबदार आहे असं म्हणत तिच्या नातेवाईकांनी अनूपविरोधात आणि रुग्णालयाविरोधात आंदोलन केलं होतं.

आंदोलनाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले होते. तिथेही अनूपची बरीच बदनामी करण्यात आली होती. या सगळ्याला अनूप कंटाळला होता. हा मानसिक ताण त्याला सहन न झाल्याने त्याने जीव देण्याचं निश्चित केलं होतं. हा तणाव इतका वाढला होता की अनूपला आपल्यानंतर आपल्या बायकोचं आणि लहान मुलाचं काय ? हा प्रश्नही त्यापुढे खुजा वाटला होता. अनूपच्या आत्महत्येनंतर इतर डॉक्टरांनी पुढे येत अनूप हा उत्तम डॉक्टर होता हे लोकांना सांगण्यास सुरूवात केली आहे. त्याने अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या, मात्र दरवेळी परिस्थिती नियंत्रणात असतेच असे नाही असे या डॉक्टरांनी म्हटलेआहे.

इंडीयन मेडिकल असोसिएशनचे तिरूअनंतपुरम इथले प्रमुख पदाधिकारी असलेले डॉ.सुल्फी नुहू यांनी अनूपच्या आत्महत्येबद्दल खेद व्यक्त केला आहे. सोशल मीडियाने त्याला दोषी ठरवलं आणि त्याने मुलीचा खून केला अशा पोस्ट प्रसिद्ध झाल्या असं नुहू यांनी म्हटलंय. हे सगळे प्रकार नकारात्मक बातम्या पसरवून प्रसिद्धी मिळवण्याचा निंदनीय प्रकार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ज्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये अनूपबद्दल वाईटसाईट लिहिण्यात आलं त्या पोस्टवरून कारवाई व्हायला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.