येवा वो, गावठी भाजी घेवा… मालवणच्या तरुणाने दुचाकीवर थाटला व्यवसाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत धावपळीच्या जगात लोकलमध्ये धक्के खात कामावर जायचो. तुटपुंज्या पगारात कसा गाडा चालणार. त्यामुळे जिवाला स्वास्थ्य नाही. येथील एमआयडीसीमध्ये नोकरी करायची म्हटली तर दिवसाला अडीचशे ते तीनशे रुपये रोज मिळतात. त्यापेक्षा या व्यवसायावरच माझ्या कुटुंबाचा चरितार्थ उत्तमरीत्या चालतो.

‘बोललात तर मातीही विकली जाईल अन्यथा सोनेही खपणार नाही’ अशी ग्रामीण भागात म्हण आहे. व्यवसायात सातत्य, प्रामाणिकपणा आणि बोलक्या स्वभावाने सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण धामापूर येथील नितीन माडये या तरुणाने मागील चार वर्षे आपल्या दुचाकीवरच भाजी केंद्र थाटून स्वयंरोजगार निर्माण केला आहे. स्थानिक शेतकऱयांकडून कडधान्य, उकडा तांदूळ, केरसुनी, नारळ यांसारखा इतरही उत्पादित माल खरेदी केला जात असल्यामुळे त्यांनाही आपली हक्काची रक्कम मिळाली आहे.

कोरोना काळात मुंबईतून गावी आलेल्या नितीनने उदरनिर्वाहासाठी सुरुवातीला स्थानिक शेतकऱयांनी पिकवलेली भाजी गावातच थेट घरोघरी नेऊन विकण्यास सुरुवात केली. व्यवसायात हळूहळू दम बसत असतानाच त्याने दुचाकी घेऊन आठवडय़ात सोमवार व गुरुवार कुडाळ तालुक्यातील वालावल, चेंदवण. मंगळवार व शनिवार मालवणमधील धामापूर, काळसे. शुक्रवारी वेंगुर्ले तालुक्यातील परुळे. गुरुवारी ओरोस आणि दररोज सायंकाळी कुडाळ-सावंतवाडी जुन्या मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी नितीन आपल्या दुचाकीवर विशिष्टरीत्या वेगवेगळय़ा गावठी भाज्यांची मांडणी करतो. त्यासोबतच केरसुणी, उकडा तांदूळ, कोकम, आगळ, नाचणी, वरी, लाल, सफेद चवळी यासारख्या स्थानिक उत्पादकांकडून घेतलेला माल विक्रीसाठी ठेवतो.

पावसाळय़ात कुडाळ तालुक्यातील माडयाची वाडी, थंडीच्या काळात वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे, उन्हाळय़ात मालवणमधील काळसे, धामापूर येथील शेतकऱयांकडून नितीन मालाची उचल करतो. सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत ‘भाजी घ्या, भाजी गावठी ताजी भाजी’ असे शब्द कुडाळ शहरात सर्वांच्याच कानी पडतात. कोकणी मुखात रसाळ शब्द, मनमोकळा स्वभाव यामुळे ग्राहकही नितीनच्या या भाजी पेंद्राकडे आपसूकच ओढले जातात.
स्वप्नील साळसकर