
पुणे शहरातील कोंढवा परिसरातील लेप्रसी हॉस्पिटलजवळ धोबीघाट येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अक्षय उर्फ बंटी गायकवाड (वय २८ रा. येवलेवाडी ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार तरुणाच्या डोक्यात दांडूक्याने प्रहार केला आणि दगड डोक्यात घालून हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास धोबी घाट परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अक्षयचा मृतदेह आढळून आला. हत्येचे कारण अद्याप समजले नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.






























































