सरकारच्या अब्रूची लक्तरे निघाली, कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात तरुणीवर गँगरेप

21 वर्षीय तरुणीला नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर सलग 10 दिवस सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने टिटवाळा हादरला असतानाच आज या तरुणीने कल्याणच्या शासकीय विश्रामगृहातही नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा जबाब दिल्याने सरकारी यंत्रणा हादरून गेली आहे. सरकारी वास्तूतच महिलेवर गँगरेप झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने सरकारच्या अब्रूची साफ लक्तरे निघाली आहेत.

काwटुंबिक वादामुळे टिटवाळय़ातील ही पीडित तरुणी तिच्या कल्याण येथील झीनत आणि शबनम या मैत्रिणींकडे राहण्यास गेली होती. काही दिवसांनी ही तरुणी घरी निघाली असता झिनत आणि शबनम यांनी गुड्डू नामक इसमाला बोलावून घेतले. गुड्डूने तिला घरी नेण्याऐवजी एनआरसी कॉलनीजवळील एका चाळीत नेले. शबनमने या तरुणीच्या मानेत नशेचे इंजेक्शन टोचले. ती शुद्धीवर आली तेव्हा कल्याणच्या रामबाग येथील लियाकत नामक इसमाच्या रेस्टरूममध्ये होती. पुढे 10 दिवस तिला नशेची इंजेक्शने टोचून तिच्यावर रोज सामूहिक बलात्कार करण्यात आला. 3 मे रोजी शुद्धीत आल्यानंतर ती एका खोलीत कुलूपबंद असल्याचे तिला जाणवले. तिने आरडाओरड केल्यानंतर तिथून जाणाऱया एका व्यक्तीने कुलूप तोडून तिची सुटका केली. त्यानंतर तिने टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली कर्मकहाणी सांगितली. पोलिसांनी झीनत, शबनम, गुड्डू, गुलफाम, लियाकत यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला; परंतु तत्पूर्वीच सगळे आरोपी फरार झाले.

सरकारी रेस्ट हाऊसमध्ये कोणी परवानगी दिली?

तरुणीच्या तक्रारीनंतर टिटवाळा पोलिसांनी तातडीने शासकीय विश्रामगृहात धाव घेऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात आणून आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला असेल तर रेस्ट हाऊस त्यांना कोणी उपलब्ध करून दिले, असा प्रश्न निर्माण झाला असून त्या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी आज अली हुसेन इराणी या आरोपीस अटक केली असून त्याच्यावर ड्रग पुरवठा आणि पीडितेला धमकावण्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी लियाकत शेख, झीनत, शबनम, गुड्डू, गुलफाम हे अद्यापही फरार आहेत.