
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील लाखो तरुणांची रोजगाराची संधी हिरावली गेली. दुसरीकडे, राज्यातील विविध विभागातील नोकर भरती रखडल्याने तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे. या रोषाचा सामना नांदेड दौऱयाकर असणाऱया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज करावा लागला. पोलीस भरतीच्या मुद्दय़ावरून आक्रमक झालेल्या तरुणांनी फडणवीस यांना घेराव घातला.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त फडणवीस नांदेडमध्ये आले असता ‘पोलीस भरती झालीच पाहीजे’ अशी जोरदार घोषणाबाजी करत तरुणांनी त्यांचा रस्ता रोखला. पोलीस भरतीवरून तरुण आक्रमक झाल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात शेकडो तरुण सहभागी झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
…अन्यथा तीव्र आंदोलन
या घटनेनंतर आंदोलक तरुणांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आंदोलक म्हणाले, पोलीस भरतीची प्रक्रिया काही वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे तरुणांसमोर रोजगाराचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने तत्काळ ही भरती करावी. आजच्या आंदोलनानंतर तरी राज्य सरकार पोलीस भरतीबाबत काही निर्णय घेते का, हे पाहावे लागेल. अन्यथा याहून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

































































