धक्का लागल्यामुळे तरूणावर वार; दीप बंगला चौकातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धक्का लागल्यामुळे झालेल्या वादातून तिघांनी दोन तरूणांना मारहाण केली आहे. त्यानंतर एकावर काचेची बाटली फोडून त्यांच्या गळयावर वार केला. ही घटना रविवारी रात्री 11.30 सुमारास वडारवाडीतील दीप बंगला चौकात घडली. अजिंक्य साबळे (वय 28, रा. कात्रज) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश कांबळे (वय 18, रा. शिवाजीनगर) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महेश रविवारी रात्री 11.05 वाजण्याच्या सुमारास त्यांचे मित्र अजिंक्य साबळे यांच्यासह वडारवाडीतील मेडीकलमधून औषध घेतले आणि परतत होते. त्यावेळी समोरून आलेल्या एकाचा त्यांना धक्का लागला. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी महेश आणि अजिंक्य यांना मारहाण केली. त्यानंतर अजिंक्य यांच्यावर काचेची बाटली फोडून वार करत त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार तपास करीत आहेत.