युवा महोत्सवात बार्शीचे शिवाजी महाविद्यालय ठरले अव्वल! संगमेश्वर कॉलेज दुसरे, तर अकलूजला तिसरे बक्षीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अठराव्या युवा महोत्सवाचे विजेतेपद 91 गुणांसह बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. 50 गुणांसह संगमेश्वर कॉलेज दुसरे, तर 49 गुण घेऊन अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाने तिसरे बक्षीस पटकावले.

मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा युवा महोत्सव उत्साहात पार पडला. बुधवारी पारितोषिक वितरण झाले. सिनेअभिनेत्री ‘सैराट’फेम रिंकू राजगुरू आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार अध्यक्षस्थानी होती. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुजित कदम, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा, तेजस्विनी कदम, प्रियदर्शनी महाडिक, विद्यार्थी विकासचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे, डॉ. गुणवंत सरवदे आदी उपस्थित होते.

ललित, वाङ्मय, नाटय़ या तीनही विभागांचे सर्वसाधारण विजेतेपद बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. नृत्य विभागाचे पारितोषिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागास मिळाला. संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद दयानंद कॉलेजला मिळाले. सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी आभार मानले.

सांगोल्याची तृप्ती ‘गोल्डन गर्ल’; तर बार्शीचा सूरज ‘गोल्डन बॉय’

युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीस ‘गोल्डन गर्ल’, तर विद्यार्थ्यास ‘गोल्डन बॉय’चा किताब दिला जातो. सांगोला कॉलेजची तृप्ती बेंगलोरकर गोल्डन गर्लची मानकरी ठरली, तर बार्शीच्या शिवाजी कॉलेजच्या सूरज काळे याने गोल्डन बॉयचा किताब पटकाविला.