परभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले

सामना प्रतिनिधी । सेलू

सेलू-वालूर रोडवरील ब्राह्मणगावजवळ एका 35 वर्षांच्या तरुणाला काही जणांनी मारहाण करून डिझेल ओतून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 8.30 ते 9 वाजेदरम्यान ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील सतीश दत्तराव बरसाले (35) यांचा घरासमोर असलेल्या गटारीवरून शेजारच्या खोसे कुटुंबासोबत शुक्रवारी वाद झाला होता. गावकऱ्यांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आला होता. मात्र, शनिवारी सकाळी 9.30 वाजता सतीश ट्रॅक्टर घेऊन घरी येत असताना गावाजवळ उद्धव खोसे, दिगंबर खोसे, राजेभाऊ खोसे, जीवन खोसे, दत्ता खोसे, नामदेव खोसे, आसाराम खोसे, गणेश खोसे, काशिनाथ खोसे, रामप्रसाद खोसे, संपती खोसे, कारभारी खोसे यांनी सतीश यांना अडवले. ट्रॅक्टरवरून खाली ओढत रस्त्याच्या कडेला नेऊन लाथा-बुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. त्यानंतर सतीशच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना पेटवण्यात आले. या घटनेत सतीश यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलीस निरीक्षक संदीपान शेळके आदींसह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेनंतर गावात अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सतीश यांचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. यासंदर्भात मृताचा भाऊ वैजनाथ दत्तराव बरसाले यांनी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी कारभारी बाबाराव खोसे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सतीश यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यामुळे मृतदेह सायंकाळपर्यंत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातच होता. अखेर सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. घटनेच्या तपासासाठी फॉरेन्सिक लॅबचे पथकही दाखल झाले होते. या प्रकरणी सर्व आरोपींविरोधात सेलू पोलीस ठाण्यात वैजनाथ बरसाले यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान शेळके करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या