पुणे- टोळक्याच्या खूनी हल्ल्यात शिवसेनेच्या युवा सेना पदाधिकाऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विना नंबरप्लेट दुचाकींवरून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदारसंघ युवा सेना पदाधिकारी दीपक विजय मारटकर (वय ३२) यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ही घटना काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शुक्रवार पेठेतील गवळी आळीत घडली. याप्रकरणी अद्याप हल्लेखोरांचा शोध लागलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे ते पुत्र होते. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली. त्याशिवाय हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक मारटकर हे शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदारसंघ युवा सेनेचे पदाधिकारी होते. त्यांचे वडील दिवंगत विजय मारटकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे. दीपक काल मध्यरात्री रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास गवळी आळी परिसरात थांबले होते. त्यावेळी विना नंबरप्लेट दुचाकीवरुन आलेल्या मास्कधारी पाच ते सहा जणांच्या सशस्त्र टोळक्याने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यामुळे दीपक यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर जखम झाली . त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. परिसरात आरडाओरडा झाल्यामुळे नागरिकांनी तत्काळ दीपक यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानंतर या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यांचा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

संशयितांची चौकशी सुरू

शिवसेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघ युवा सेना पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या हल्ल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी केली जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.