एमटीएनएल केबल चोरी प्रकरणाची केंद्रीय दक्षता आयोगाकडून चौकशी करा!महानगर टेलिफोन निगम कामगार संघाची मागणी

टेलिफोन ग्राहकांना टेलिफोन निगम गेल्या 60-70 वर्षांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना सेवा देत आहे. निगमच्या टेलिफोन केबलचे जाळे जमिनीखाली पसरवण्यात आले असून त्यातील कित्येक केबल्स या निकामी झाल्या असून थोडय़ाच केबल कार्यरत आहेत. निष्क्रिय केबल काढून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेही धोरण नसल्याने किती किलोमीटर केबल बाहेर काढण्यात आली व किती केबल स्टोअरमध्ये जमा झाली, त्या केबलचे पुढे काय झाले? निष्क्रिय केबलचा लिलाव करून निगमच्या तिजोरीत किती रक्कम जमा झाली, याची माहिती उपलब्ध नाही तसेच एमटीएनएलच्या केबल चोरीचे प्रमाणदेखील मोठे आहे. या सर्व प्रकरणाची केंद्रीय दक्षता आयोगाकडून चौकशी करा, अशी मागणी शिवसेना नेते खासदार महानगर टेलिफोन निगम कामगार संघ आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी केली आहे.

महानगर टेलिफोन निगम कामगार संघ आणि भारतीय कामगार सेनेच्या वतीने प्रभादेवी येथील मुख्यालयाजवळ कर्मचाऱयांनी जोरदार निदर्शने करत निगम प्रशासनाला याबाबत जाब विचारला. भविष्यात जर असे प्रकार थांबले नाहीत तर या विरोधात महानगर टेलिफोन निगमचे कर्मचारी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे सरचिटणीस व भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, कामगार संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश शिरवाडकर, स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष संजय ढोलम, सरचिटणीस बाळा साटम, ऑफिसर्स असोसिएशनचे सूर्यकांत मुद्रस, केवलकर, दूरसंचार निवृत्त कर्मचारी संघाचे सरचिटणीस जयदत्त असरोंडकर, खजिनदार प्रदीप परब, पतपेढीचे अध्यक्ष महेश धुरी यांच्यासह महानगर टेलिफोन निगमचे अधिकारी आणि कर्मचारी प्रचंड संख्येने उपस्थित होते.

…तर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

निगमच्या कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्यांकडे निगमचे आस्थापन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून कर्मचाऱयांच्या न्याय्य मागण्यांसाठी महानगर टेलिफोन निगम कामगार संघ आणि ऑफिसर्स असोसिएशनच्या वतीने सोमवार, 16 जूनपासून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.