
उरण परिसरात आलेल्या अनेक सरकारी प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांचे पारंपरिक उदरनिर्वाहाचे साधन शेती, मिठागरे व मासेमारी व्यवसाय नष्ट झाले. जमीन, घरे बाधित होऊनही अनेक प्रकल्पबाधितांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करूनही न्याय मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जेएनपीए टाऊनशीपमध्ये शनिवारी झालेल्या मेळाव्याला जेएनपीए, सिडको प्रकल्पामध्ये बाधित झालेले मीठ उत्पादक, मच्छीमार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेएनपीएने बंदर उभारण्यासाठी ३००० एकर मिठागरांची जमीन संपादित केली. या मिठागरांच्या जागेत अनेक मिठागर उत्पादक व त्यांची कुटुंबे मीठ उत्पादनासोबत जोड व्यवसाय म्हणून कमाई करत होते. तर काही मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. तो जोड व्यवसाय आता बुडाल्याने त्यांना जेएनपीएने आर्थिक नुकसानभरपाई देण्याची गरज आहे. मात्र याकडे वारंवार मागणी करूनही जेएनपीएकडून दुर्लक्ष केले जात आहे. यावर जेएनपीएने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
उरण पेठा मिठागर युनियनचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. यावेळी रामचंद्र म्हात्रे, कर्णिक पाटील, जगदीश तांडेल, संदीप पाटील, भूषण पाटील, किशोर घरत, रोहिदास पाटील, सुरेश म्हात्रे, डी. एस. म्हात्रे, शांताराम पाटील, हेमलता पाटील यांनी मार्गदर्शन केले.



























































