बाळ बोठेचा मित्र तनपुरेच्या घराची झाडाझडती, मोबाईल फोन हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेला साहाय्य करणारा हॉटेल व्यावसायिक महेश तनपुरे याला पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याच्या घराची तपासणी केली असून, काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तनपुरे याचे मोबाईल फोनही पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती तपासी अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे.

रेखा जरे हत्याकांडामध्ये आतापर्यंत दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील मुख्य आरोपी बोठे हा त्याच्या कुटुंबाशी त्याचा मित्र महेश तनपुरे याच्यामार्फत सातत्याने बोलत होता. तनपुरे संपर्कात असल्याचे उघड झाल्याने बोठेला अटक केल्यानंतर त्याच दिवशी पोलिसांनी तनपुरे याला सावेडी येथील घरातून अटक केली. तनपुरे हा पाईपलाईन रोड परिसरातील रहिवासी आहे. आज तपासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या पथकाने तनपुरे याच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारीसुद्धा हजर होते. त्यांनी त्याच्या घरामधून काही वस्तू हस्तगत केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याच्याकडे काही मोबाईल सापडले असून, तेसुद्धा पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सुमारे तीन तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरू होती.

बोठेकडून चौकशीत असहकार्य

n बाळ बोठे याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे, पण गेल्या तीन दिवसांपासून तो कोणतीच माहिती द्यायला तयार नाही. पोलिसांनी विविध प्रश्न विचारल्यावर त्याच्याकडून फक्त नाही, असेच उत्तर येत आहे. हैदराबादमध्ये पकडलेल्या अन्य आरोपींकडे पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. त्यांच्या ताब्यातून हस्तगत केलेल्या मोबाईलची पडताळणी सुरू झाली आहे. ते कोणा-कोणाच्या संपर्कात होते आणि कशा पद्धतीने मोबाईलचा वापर केला, यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.