सांगली – रुग्णांकडून जास्त बिल आकारणाऱ्या नऊ रुग्णालयांनी सव्वासात लाख रुपये परत केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिन्यापर्यंत कोरोनाचा वाढता कहर आणि बाधितांना उपचारासाठी अडचणी येत होत्या. या कालावधीत जिह्यातील विविध रुग्णालयांत उपचाराची सोय केली होती. या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकापेक्षा जादा बिल आकारणाऱया रुग्णालयांकडून होणारी लूट थांबली असून, सव्वासात लाखांहून अधिकची रक्कम नऊ रुग्णालयांनी रुग्णांना परत केली आहे.

कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱया रुग्णालयांत अवाच्या सवा दराने बिलांची आकारणी होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी खास पथकांची नियुक्ती केली होती. त्यात प्रत्येक रुग्णालयाच्या तपासणीसाठी पथक तैनात केले होते. या पथकांकडे तक्रारी आल्यानंतरही त्याची शहानिशा केली जात होती. त्यानुसार जिह्यातील 41 रुग्णालयांतील बिलांची तपासणी करण्यात आली.

पथकांकडे 6692 देयके लेखापरीक्षणासाठी आली होती. त्यातील 1344 देयकांमध्ये तफावत आढळल्याने संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

जिह्यातील रुग्णालयांना आतापर्यंत 486 नोटिसा बजाविल्या असून, रुग्णांकडून डिस्चार्जपूर्वी अथवा डिस्चार्जनंतर आलेल्या तक्रारींचीही तपासणी होत आहे. त्यात 41 रुग्णांना आतापर्यंत परतावा परत दिला आहे, तर अद्यापही पथकांची रुग्णालयांच्या बिलांवर नजर कायम आहे.