
सामना प्रतिनिधी । मुंबई
गाडी घेऊन घराबाहेर पडणार्या मुंबईकरांना आजपासून पार्किंग करताना चांगलेच सावध राहावे लागणार आहे. कारण तुम्ही जर पालिकेच्या वाहनतळापासून 500 मीटरच्या आत गाडी लावल्यास एक हजारापासून थेट दहा हजारांपर्यंत दंड वसूल केला जाणार आहे. दरम्यान, पालिकेने बेकायदा पार्किंगविरोधात दंड वसुलीसाठी निर्धारित केलेली एक किमीची हद्द शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे 500 मीटरवर आणल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत दररोज शेकडो वाहनांची भर पडत असून आता ही संख्या 33 लाख 52 हजारांवर गेली आहे. यातच वाहनचालकांच्या मनमानी पार्किंगमुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली असून वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा होत आहेत. त्यामुळे पार्किंगला शिस्त लावण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या निर्देशानुसार पालिकेच्या पार्किंगपासून एक किमी अंतराच्या आत पार्किंग केल्यास 7 जुलैपासून एक ते दहा हजारांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी विरोध केला. पालिकेकडे सध्या उपलब्ध असणार्या वाहनतळांवर फक्त 34 हजार 808 वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था आहे. त्यामुळे एखाद्या वाहनतळ क्षेत्रात एकाच वेळी हजारो वाहने आल्यास ती पार्क कशी करणार असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. पालिकेच्या या कठोर निर्णयाविरोधात स्थायी समिती, सुधार समिती आणि महासभेतही जोरदार आवाज उठवण्यात आला होता. पालिकेचा नियम संपूर्ण मुंबईत सरसकट लागू करणे शक्य नसल्यामुळे नियमाची विभागवार पुनर्रचना करून आवश्यकतेनुसार दंडासाठी पालिकेच्या पार्किंगपासून शंभर ते पाचशे मीटरपर्यंत हद्द ठरवून तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गटनेत्यांच्या बैठकीत महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले होते.
असा आकारणार दंड
वाहन टोइंग दंड विलंब विलंब किमान दंड कमाल दंड
(किमान) (कमाल)
ट्रक/बस 5000 10000 275 11000 15000 23250
टेम्पो 3300 7700 220 8800 11000 17600
कार 2500 7500 170 6800 10000 15100
तीन चाकी 1100 6900 140 5600 8000 12200
दुचाकी 700 4300 110 4400 5000 8300
पहिल्या टप्प्यात 23 ठिकाणी कारवाई
पहिल्या टप्प्यात पालिका कार्यक्षेत्रातील वाहनतळ असलेल्या 23 ठिकाणी ही कारवाई केली जाणार आहे. यामध्ये दंडाबरोबरच टोइंगची रक्कमही वसूल केली जाणार आहे. या 23 सार्वजनिक वाहनतळांपैकी सात ठिकाणी कंत्राटदाराची नेमणूक होईपर्यंत मोफत वाहन पार्क करता येईल तर लवकरच आणखी तीन ठिकाणी वाहनतळ सुरू केले जाणार आहेत.
…तर विकासकांना अतिरिक्त चटईक्षेत्र नाही
पालिका नियम व अटींच्या अधीन राहून विकासकांना सार्वजनिक वाहनतळ उभारून पालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या बदल्यात अतिरिक्त चटईक्षेत्र (एफएसआय) देते. मात्र संबंधित विकासक जोपर्यंत पालिकेकडे वाहनतळ हस्तांतरित करणार नाही तोपर्यंत अतिरिक्त चटईक्षेत्र देण्यात येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
30 दिवसांत गाडी न्या, अन्यथा लिलाव
बेकायदा पार्किंग केलेले वाहन टोइंग केल्यानंतर मालकी हक्काचा दावा मालकाकडून सांगण्यात येईपर्यंत प्रतिदिन विलंब आकार लावला जाणार आहे. संबंधित वाहन जर मालकाने 30 दिवसांच्या आत सोडवून नेले नाही तर ते बेवारस समजून त्याची लिलावात विक्री करण्यात येईल.
सध्याचे शुल्क
पालिकेच्या वाहनतळांवर सध्या संबंधित विभागानुसार दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना प्रतितास 20 रुपयांपासून 60 रुपये, 70 रुपये, 140 रुपयांपासून कमाल 210 रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क आकारले जाते.
… तर 23 हजार मोजा
पालिकेने अंतर कमी केले असले तरी दंड भरण्यास दिरंगाई करणाऱयांकडून जादा वसुली करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये ट्रक, बससारख्या अवजड वाहनांना टोइंग शुल्क 5 हजार, दंड दहा हजार, विलंब केल्यास किमान 11 हजार दंड निश्चित केला आहे. यामध्ये मोठय़ा वाहनांना किमान 15 तर कमाल 23,250 रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो.




























































