
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील मंदिरे, धार्मिक स्थळे आणि चौकाचौकात गायी बांधून पैसे घेणाऱयांकडून पालिका आता दहा हजारांचा दंड वसूल करणार आहे. अस्वच्छता आणि दुर्गंधी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे. याआधी हा दंड अडीच हजार रुपये होता. मात्र हा दंड आता चार पट म्हणजेच 300 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे जनावरे बांधणे बेकायदेशीर असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
मुंबईतील मंदिरे, रस्त्यांचे नाके, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी गायी- गुरे बांधली जातात. या ठिकाणी गायींना चारा देण्याच्या मोबदल्यात पैसे घेतले जातात. मात्र गायीला बांधलेल्या ठिकाणी मल-मूत्र, चारा पडून त्या जागा अस्वच्छ होऊ परिसरात दुर्गंधी पसरते. बेकायदेशीरपणे अशा गायी-गुरांना पालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत जप्त केले जाते. गायीगुरांना जप्त केल्यानंतर त्यांना मालाड येथे नेण्यासाठी पालिका वाहन, कर्मचारीवर्ग, वाहनांचे इंधन आदींवर मोठय़ा प्रमाणात खर्च येतो. हा खर्च दंडाच्या स्वरूपातून कसूल केला जातो. यापूर्वी बांधून ठेवलेल्या गायी पकडून नेल्यानंतर त्या सोडवण्यासाठी पालिकेकडून अडीच हजार रुपये इतका दंड आकारला जात होता. मात्र आता मालकाला आपली गाय परत मिळवण्यासाठी दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
भाजपच्या मागणीनंतरच निर्णय
भाजपच्या नगरसेविका नेहल शाह यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे पालिकेच्या महासभेत हा मुद्दा मांडला होता. मुंबईत मंदिरे आणि रस्त्यांच्या नाक्यावर गायी-गुरांना बांधल्यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी निर्माण होते. याशिवाय दिवसभर जनावरांना बांधून ठेवल्याने त्यांच्यावर अत्याचार होतो, असे त्यांचे म्हणणे होते. शिवाय केवळ अडीच हजार दंड असल्याने मालक आपली जनावरे सोडवून नेल्यानंतर पुन्हा त्या जागी बसत असल्याने कारवाईच्या दंडात जबर वाढ करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर उत्तर व अभिप्राय देताना आयुक्तांनी दहा हजारांचा दंड करीत असल्याचे स्पष्ट केले आहे.
15 वर्षांनी दंडाच्या रकमेत वाढ
कोंडवाडय़ामार्फत पकडण्यात येणाऱ्या मोठय़ा जनावरांसाठी सध्या 2500 रुपये दंड आकारला जातो, तर लहान जनावरांसाठी 1500 रुपये दंडाची रक्कम आकारली जाते. मार्च 2004 मध्ये पालिकेने मंजूर केल्याप्रमाणे ही दंडाची रक्कम आकारली जाते. परंतु आता या दंडाच्या रकमेत 15 वर्षांनी वाढ करण्यात येणार आहे. पकडण्यात आलेल्या मोठ्या जनावरांसाठी 10 हजार रुपये तर लहान जनावरांसाठी 6 हजार रुपये एकढा दंड आकारला जाईल, असे देवनार पशुवधगृहाच्या महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे.




























































