कश्मीरात पाच महिन्यांत 101 दहशतवादी ठार, 50 तरुणांनी स्वीकारला दहशतवादाचा मार्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indian-army-jawan-in-jk

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू आणि कश्मीरात 2019 च्या पहिल्या पाच महिन्यांत तब्बल 101 दहशतवादी सुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झाले. तरीही मोठ्या प्रमाणात तरुण दहशतवादाकडे वळत असल्याबद्दल सुरक्षा यंत्रणांनी चिंता व्यक्त केली आहे. मार्च 2019 पासून आजवर 50 तरुण विविध दहशतवादी संघटनांत सहभागी झाले आहेत.

31 मेपर्यंत कश्मीरात 23 परदेशी दहशतवादी आणि 78 स्थानिक दहशतवादी सुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झाले. यात टॉप कमांडर झाकीर मुसा याचा समावेश आहे. ‘अन्सार गझवात अल हिंद’ या संघटनेचा मुसा हा प्रमुख होता. हा गट ‘अल कायदा’शी संलग्न आहे.

23 मे रोजी मुसा याचा सुरक्षा दलाने खात्मा केल्यानंतर ‘हिजबुल मुजाहिदीन’ व ‘अन्सार गझवात अल हिंद संघटने’त सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

कश्मीरातील तरुणांना दहशतवादाच्या मार्गापासून रोखण्यासाठी व्यूहरचना करण्याची गरज असून सर्व दहशतवादविरोधी धोरणांचा पुनर्विचार करणे जरूरी आहे. तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना कट्टरतावादाचे दुष्परिणाम समजावून सांगणे गरजेचे आहे.

कश्मीरातच सर्वाधिक 25 दहशतवादी शोपियन जिह्यात मारले गेले. यात 16 स्थानिक व 9 परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. पुलवामात 15 दहशतवादी, अवंतीपोरा येथे 14 आणि कुलगाममध्ये 12 दहशतवादी गेल्या पाच महिन्यांत मारले गेले.

नियंत्रणरेषेवरून पूँछ आणि राजौरी जिह्यात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. 2010 ते 2013 दरम्यान अनुक्रमे 54, 23, 21 आणि 6 तरुणांनी शस्त्र हाती घेतली. संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार 2014 पासून तरुणांचे दहशतवादाकडे वळण्याचे प्रमाण वाढतच गेले आहे. 2014 मध्ये 53 तरुण दहशतवादाकडे वळले, 2015 मध्ये 66, तर 2016 मध्ये सर्वाधिक 88 तरुण दहशतवादी बनले.

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर हिंदुस्थाने एयर स्ट्राईक केला. या घटनेनंतर कश्मीरात लोक सुरक्षा दले कारवाई करीत असताना स्थानिक लोक जवानांवर दगडफेक करीत आहेत. कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या दफनविधींना मोठय़ा प्रमाणात लोक गोळा होत आहेत. या वातावरणात नव्या तरुणांच्या भावनांना साद घालून त्यांना दहशतवादाकडे वळण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांच्या संघटना करीत आहेत.