
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबई उपनगरामध्ये गेल्या आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सरपटणारे प्राणी मानवी वस्त्यांमध्ये शिरल्याच्या घटना घडल्या. गेल्या आठ दिवसांमध्ये ‘पॉझ’ या पशूप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बोरिवली, दहिसर, भांडुप, पवई, गोरेगाव परिसरातून 11 साप पकडले. त्यात 6 धामणी, 2 घोणस, 2 पानदिवड आणि एका अजगराचा समावेश होता. या सापांची पशुवैद्यांकडून तपासणी केल्यानंतर त्यांना निसर्गात सोडून देण्यात आले.
अजगराला गोचिडींचा विळखा
एरवी विळखा घालून शिकार करणाऱया अजगरालाच गोचिडींनी विळखा घातल्याचा आश्चर्यकारक प्रकार दहिसर पूर्व येथील अशोकवन परिसरात पाहायला मिळाला. अशोकवन येथे राहणारे संदेश धागे यांच्या घरातील किचनमध्ये हा अजगर घुसला होता. ‘पॉझ’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा दहा फुटी अजगर पकडून घराबाहेर काढला. या अजगराला 50-60 गोचिडी चिकटलेल्या होत्या. सरपटणाऱ्या प्राण्याला गोचिडी चिकटल्याने पहिल्यांदाच आढळल्याचे ‘पॉझ’ संस्थेचे अध्यक्ष सुनीश सुब्रमण्यम यांनी सांगितले. पशुवैद्यक डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर या अजगराला निसर्गात सोडण्यात आले.


























































