
सामना प्रतिनिधी । गंगाखेड
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या वतीने ३ ते १५ वर्षाच्या मुलांना रूबेला लस देण्याचा कार्यक्रम आरोग्या विभागाने हाती घेतला असता रुबेला लस टोचवल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ५ विद्यार्थी व पालम येथील रुग्णालयात ६ दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या लसीमुळे पालक व विद्यार्थांत एकच घबराट निर्माण झाली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने मागील ३ महीन्यापासून रूबेला लसीकरणाची जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसह पालकांना आरोग्याच्या दृष्टीने रुबेला लसीकरण किती महत्वाचे आहे याची जागृती केली. त्यानसुसार मागील आठ दिवसापासून विविध शाळेंना तारखा देऊन आरोग्य विभाग प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना लसीकरण करत आहेत. ३ डिसेबर रोजी पालम तालुक्यातील चाटोरी येथील वसंतराव नाईक विद्यामंदिर येथे आरोग्य विभागाच्या वेळापत्रकानुसार लसीकरणाची तारीख होती. त्यानुसार त्या शालेय विद्यार्थ्यांना रुबेला लसीकरण देण्यात आले. त्यांना काही तासानंतर मळमळ, उलटी, डोके दुखणे श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे विद्यार्थी व पालकामध्ये घबराट निर्माण झाली आहे. या घबराटीमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये व पालम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यामध्ये शितल पवार (१२), मिना खडवे (१४), कोमल चव्हाण (१३), गायत्री किरडे (१५), सिमरन मोगल (१२) या पाच विद्यार्थ्यांवर गंगाखेड येथीलउपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पालम येथे ६ विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. ही घटना समजताच संभाजीनगर येथील आरोग्य विभागाचे संचालक यांनी भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेतली.
रुबेला लसीकरणामुळे कोणतेही दुष्परिणाम नाहीत- डॉ. हेमंत मुंडे
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे म्हणाले, रुबेला लसीकरणामुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाहीत. लसीकरणामुळे विद्यार्थी घाबरत आहेत. परंतु लसीकरणामुळे प्राथमिक स्वरुपात ताप येणे, उलटी होणे, मळमळ करणे व श्वासोश्वासास त्रास होणे आदी लक्षणे होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी व पालकाने घाबरुन जाऊ नये, या लसीने सुरक्षीतता आहेच. याचा कोणताही दुष्परिणाम आरोग्यावर होणार नाही, असेही मुंडे ‘सामना’ शी बोलतांना म्हणाले.






























































