
सायबर गुह्यासाठी वापरण्यात आलेल्या 1100 सिमकार्डचे वाटप केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विविध राज्यांतील 39 एजंटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही एजंटांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम आणि महाराष्ट्रातील काही एजंटांचा समावेश आहे. या एजंटांनी वितरित केलेल्या सिमकार्डचा सायबर गुह्यासाठी वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
वितरित करण्यात आलेल्या सिमकार्डच्या जोरावर सायबर गुन्हेगार, स्कॅमर्स आणि दूरसंचार सेवा कंपन्यांचे अज्ञात अधिकारी यांच्या संगनमताने नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. डिजिटल अटक, फसव्या जाहिराती, गुंतवणूक फसवणूक, यूपीआय फसवणूक करण्यासाठी या सिमकार्डचा वापर करण्यात आला आहे. ज्या एजंटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 9 एजंट उत्तर प्रदेश, 15 पश्चिम बंगाल, 7 आसाम, 4 महाराष्ट्र आणि प्रत्येकी 1 एजंट बिहार, तेलंगणा, तामीळनाडू आणि कर्नाटकमधील आहेत, असे गुह्यात म्हटले आहे.